Join us

शतकानंतर मुरली विजय बाद, भारताची श्रीलंकेवर आघाडी

सलामीवीर मुरली विजयचे शानदार शतक आणि चेतेश्वर पूजाराचे नाबाद अर्धशतक यांच्या फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारतानेश्रीलंकेवर आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 15:13 IST

Open in App
ठळक मुद्देसलामीवीर लोकेश राहुलचा अपवाद वगळता पहिला दिवस भारतासाठी अनुकूल ठरला.हिरवळ असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना खेळपट्टीने आपला मूळ स्वभाव कायम ठेवत फिरकीपटूंना अधिक झुकते माप दिले.  

नागपूर - सलामीवीर मुरली विजयचे शानदार शतक आणि चेतेश्वर पूजाराचे नाबाद अर्धशतक यांच्या फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारतानेश्रीलंकेवर आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात 205 धावा केल्या होत्या.  शतकानंतर विजय (128) धावांवर बाद झाला. हेरथने त्याला परेराकरवी झेलबाद केले.  शनिवारी दुस-या दिवसाच्या खेळात विजयच्या रुपाने भारताचा पहिला गडी बाद झाला. भारत 210च्या पुढे खेळत आहे. 

विजय आणि पूजाराच्या फलंदाजीसमोर श्रीलंकन गोलंदाज निष्प्रभ ठरले. विजयने शतकी खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. पूजाराने अर्धशतकी खेळीत नऊ चौकार लगावले. भारत आणि श्रीलंकेमध्ये दुस-या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुस-या दिवसाचा खेळ सुरु आहे. कालच्या एक बाद 11 वरुन मुरली विजय आणि चेतेश्वर पूजाराने डाव पुढे सुरु केला. श्रीलंकेचा पहिला डाव 205 धावात रोखल्यामुळे भारताला आज कसोटीवरील आपली पकड अधिक घट्ट करण्याची संधी आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले होते. 

सलामीवीर लोकेश राहुलचा अपवाद वगळता पहिला दिवस भारतासाठी अनुकूल ठरला. लोकेश राहुल (7) धावांवर स्वस्तात बाद झाला. नागपूर व्हीसीए जामठाच्या खेळपट्टीवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हिरवळ असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना खेळपट्टीने आपला मूळ स्वभाव कायम ठेवत फिरकीपटूंना अधिक झुकते माप दिले.  

फिरकीपटू रविचंद्रन आश्विन (४-६७) व रवींद्र जडेजा (३-५६) आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा (३-३७) यांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा पहिला डाव २०५ धावांत गुंडाळला. श्रीलंकेतर्फे करुणारत्ने (५१)व चांदीमल (५७) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली, पण त्यांना अन्य सहका-यांकडून अपेक्षित साथ लाभली नाही.  

यजमान भारताने पहिल्या कसोटी सामन्यात खेळविलेल्या संघात तीन बदल केले. मुरली विजय, रोहित शर्मा व ईशांत शर्मा यांना अनुक्रमे शिखर धवन, भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांच्या स्थानी अंतिम संघात संधी दिली. मोहम्मद शमीला दुखापत झाल्याचे विराटने सामन्यापूर्वी स्पष्ट केले. पाच गोलंदाजांना संधी देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणा-या विराटने यावेळी मात्र सात फलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला, हे विशेष.