Join us  

आक्रमक पवित्रा कायम ठेवण्याचा निर्धार; मालिका विजयाचे लक्ष्य, भारत - श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना आज

युवा फलंदाजांची आक्रमकता आणि त्याला अनुभवी फलंदाज शिखर धवनच्या संयमाची मिळालेली साथ या जोरावर भारताने श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी सहज आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 7:11 AM

Open in App

कोलंबो : युवा फलंदाजांची आक्रमकता आणि त्याला अनुभवी फलंदाज शिखर धवनच्या संयमाची मिळालेली साथ या जोरावर भारताने श्रीलंकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी सहज आघाडी घेतली. आता हाच फॉर्म कायम ठेवत भारतीय संघ मंगळवारी होणारा दुसरा सामनाही जिंकून विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने खेळेल.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी केली. ईशान किशन, पृथ्वी शॉ यांनी आक्रमक खेळी करत यजमानांना दबावाखाली ठेवले. त्याचवेळी एक बाजू लावून धरताना कर्णधार शिखर धवनने संयमी खेळीसह लंकेला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघात बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण, दुसरा सामना जिंकल्यानंतर औपचारिकतेचा ठरणाऱ्या तिसऱ्या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी देण्याचा विचार प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून होईल.

किशन आणि पृथ्वी यांनी भारताची फलंदाजी किती मजबूत आणि आक्रमक आहे, हे दाखवून दिले. दोघांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली होती. सूर्यकुमार यादवनेही पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेत भारताची फलंदाजी खोलवर असल्याचे सिद्ध केले. त्यानेही सहजपणे धावा काढताना श्रीलंकेच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. मात्र, असे असले तरी दुसऱ्या सामन्यात गाफील राहण्याची चूक भारताला महागात पडू शकते. अनुभवी मनीष पांड्ये तेवढा संघर्ष करताना दिसला. त्याला २६ धावा काढण्यासाठी ४० चेंडू खेळावे लागले.

दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष पृथ्वी शॉकडे असेल. धमाकेदार सुरुवात केल्यानंतरही त्याला मोठी खेळी करता आली नाही, याचीच खंत असेल. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो मोठ्या खेळीचा निर्धार करूनच खेळेल, यात शंका नाही. त्याचप्रमाणे, २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदा भारताच्या अंतिम संघातून एकत्र खेळलेले ‘कुलचा’ नावाने प्रसिद्ध असलेले कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनीही आपली छाप पाडली. दोघांनी शानदार मारा करताना धावांवर मर्यादा आणत बळीही मिळवले.

लंकेपुढे कठीण आव्हान

- कमी अनुभव असलेल्या भारताच्या संघाने आपल्यातील गुणवत्ता दाखवली असल्याने, यजमान श्रीलंकेला पुनरागमन करण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. 

- गोलंदाजांना विशेष घाम गाळावा लागणार असून, फलंदाजांनाही मोठ्या खेळी कराव्या लागतील. पहिल्या सामन्यात लंकेच्या अनेक फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मात्र, त्यांना मोठी खेळी करण्यात यश आले नाही. 

- भारताच्या मजबूत फलंदाजीला रोखण्यासाठी लंकेच्या गोलंदाजांना अचूक माऱ्यासह बळीही घ्यावे लागतील.

लंकेविरुद्ध सर्वाधिक वन डे जिंकणारे संघ

संघ                   सामने   विजय   पराभव टाय      अनिर्णीत

पाकिस्तान        १५५     ९२        ५८       १          ४

भारत                १६०      ९२        ५६       १          ११

ऑस्ट्रेलिया        ९७       ६१        ३२        ०          ४

न्यूझीलंड           ९९        ४९        ४१        १          ८

द. आफ्रिका       ७७       ४४        ३१        १          १

 

टॅग्स :भारतश्रीलंका