केपटाऊन : सलग बरसलेल्या पावसामुळे भारत - दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसºया दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे तिस-या दिवसातील पहिल्या दोन सत्रात खेळ होऊ शकला नाही. यानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे ३ वाजून ३० मिनिटांनी दिवसभराचा खेळ रद्द करण्यात आला.
आता, सामन्यातील उर्वरित दोन्ही दिवशी आकाश निरभ्र राहणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच, दोन्ही दिवशी प्रत्येकी ९८ षटकांचा खेळ खेळविण्यात येईल. या दोन्ही दिवशी निर्धारित वेळेनुसार सामन्याला सुरुवात होईल. परंतु, अंतिम दोन सत्रांमध्ये प्रत्येकी १५ मिनिटांचा अतिरिक्त खेळ होणार असून षटके पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त अर्ध्या तासाचाही खेळ खेळविला जाऊ शकेल.
दरम्यान, रविवारच्या दिवशी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली होती. सामना सुरू होण्याच्या वेळेला पावसाचा जोर खूप वाढला होता. त्याचवेळी, विश्रांतीनंतर काही वेळासाठी पाऊस थांबला आणि यादरम्यान कर्मचाºयांनी मैदान सुकविण्यासाठी प्रयत्न केले. या वेळी तीन कव्हर हटवून सुपर सॉपरचाही वापर करण्यात आला. मात्र, यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. यामुळे ज्या ठिकाणी मैदान सुकविण्यात आले होते, तेथे पुन्हा एकदा पाणी भरले.
संपूर्ण दिवस पावसाने वाया गेल्यानंतरही दोन दिवस शिल्लक असल्याने सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २८६ धावा उभारल्यानंतर भारताला २०९ धावांची मजल मारता आली. यानंतर ७७ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरलेल्या यजमानांनी दुसºया डावात २ बाद ६५ धावांची मजल मारली असून ते आता एकूण १४२ धावांच्या आघाडीवर आहेत. (वृत्तसंस्था)