राजकोट : वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉ याने त्याच्यावर असणा-या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. मात्र परदेशातील कठीण परिस्थितीतही धावा करायच्या असतील तर शॉने आपल्या तंत्रात बदल करावे असे मत माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे.
शॉने विंडिजविरुद्ध परिपक्व फलंदाजासारखी खेळी करत शतक झळकावले. शॉने बॅकफूटवर मारलेले फटके पाहून वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कार्ल हुपरही प्रभावित झाला. मात्र या शैलीसह परदेशात यश मिळवणे सोपे असणार नाही असे हुपरचे मत आहे.
हुपर म्हणाला, ‘त्याच्याकडे प्रतिभा आहे असे वाटते. मात्र तो चेंडूच्या रेषेत येऊन खेळत नाही. तो जास्त बॅकफुटवर खेळतो. शरीर आणि बॅट यांच्यात जास्त अंतर रहात असल्याने इंग्लंड व आॅस्ट्रेलियामध्ये त्याला अडचणी येऊ शकतात.’
भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राच्या मते विरेंद्र सेहवाग अपरांपरागत पध्दतीने खेळू शकतो तर शॉ सुद्धा यश मिळवू शकतो. तो म्हणाला, ‘आपण आता जे पाहिले ती रंगीत तालिम आहे. त्याच्यात प्रचंड गुणवत्ता आहे. त्याची खरी परीक्षा परदेशात होणार आहे. मात्र यातही तो यशस्वी होईल.’ (वृत्तसंस्था)