Join us  

माही तू दमलास, आता तुझी गरज राहिलेली नाही!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तिन्ही प्रमुख स्पर्धा भारताला जिंकून देण्यात धोनीची भूमिका ही नायकाची... पण हा नायक पडद्यासमोर कमी मागेच अधिक राहिला.. नेतृत्वकौशल्य, यष्टिमागील त्याची चपळता... याला आजही तोड नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: January 19, 2019 7:55 AM

Open in App

स्वदेश घाणेकर

महेंद्रसिंग धोनीचा खेळ मंदावलाय... दुसरी धाव घेतानाही तो धापा टाकतोय... पूर्वीच्या पुण्याईवर तो अजून किती दिवस संघातील जागा अडवून ठेवणार आहे ? त्याला आता संधी देत राहिलो तर ऋषभ पंत तयार कधी होणार? आणि तो असाचा धापा टाकत राहिला तर वर्ल्ड कपमध्ये भारताचं काही खरं नाही... या सर्व चर्चा ऑस्ट्रेलिया वन डे मालिका सुरू होण्यापूर्वीच्या... पण तीन सामने संपल्यानंतर धोनीबद्दलचं मत अजूनही तेच आहे का? 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तिन्ही प्रमुख स्पर्धा भारताला जिंकून देण्यात धोनीची भूमिका ही नायकाची... पण हा नायक पडद्यासमोर कमी मागेच अधिक राहिला.. नेतृत्वकौशल्य, यष्टिमागील त्याची चपळता... याला आजही तोड नाही. आता नेतृत्वाची धुरा विराट कोहलीच्या हातात असली तरी संकटसमयी तोही धोनीकडे धाव घेतो. शुक्रवारच्या सामन्याचे उदाहरण घ्या... 

ॲरोन फिंच भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी क्रिजपासून दोन पावले पुढेच उभे राहत होता. धोनीने काय केलं तो यष्टिजवळून कीपिंग करू लागला. भुवनेश्वर कुमारने पंचामागून गोलंदाजी करण्याची युक्ती लढवली, परंतु पंचांनी त्याला ताकीद दिली. धोनी त्वरित भुवीकडे आला आणि कोण जाणे काय सांगितले की पुढच्याच चेंडूवर भुवीने फिंचला पायचीत करत माघारी पाठवले. कर्णधार कोहली मात्र अशा परिस्थितीत पंचांशी वाद घालत बसला असता. आशिया चषक स्पर्धेतही धोनीने कर्णधार रोहित शर्माला दिलेले सल्ले यशस्वी ठरले होते. 

पण क्रिकेटमध्ये हे महत्त्वाचे नसते... धावांचा पाऊस, चौकार षटकारांची आतषबाजी, विकेट्सचा सपाटा यापलीकडे क्रिकेटमध्ये अन्य गोष्टी दुय्यम... धोनी पहिल्यासारखा जलद धाव घेत नाही.. षटकार खेचत नाही... हेलिकॉप्टर शॉट्स तर नाहीच नाही... त्यात त्याची बॅट त्याच्यावर रुसलेली.. मग तो संघात हवा तरी कशाला?

थांबा पुन्हा विचार करा.. खरचं धोनी संघात नकोय का? वेस्ट इंडिज मालिकेनंतर थेट दोन महिन्यांनी धोनी भारतीय संघात परतला. प्रवासाने दमलेला असतानाही तो ऑस्ट्रेलियात पहिल्याच सामन्यात अर्धशतक करून गेला. अन्य फलंदाजांच्या तुलनेत ही खेळी संथच होती. पण ३ बाद ४ अशा संकटकालीन परिस्थितीत त्याच्याकडून सावध खेळच अपेक्षित होता. म्हणून त्याच्यामुळे पराभव झाला असे होत नाही. तो पराभव सलामीच्या तीन फलंदाजांच्या अपयशामुळे आला होता.

सिडनी सामन्यात त्याने कमी चेंडूत ५५ धावा केल्या. तो खेळला नसता तर भारतीय संघाने मालिका सिडनीतच  गमावली असती. मग मेलबर्नवर केवळ औपचारिक सामना राहिला असता... आजही तो संथ खेळला... केदार जाधव नसता तर भारताने सामन्याबरोबर मालिका गमावली असती.. असा सूर होतोय.. बरोबर आहे ११४ चेंडूत ८७ धावा ही काय खेळी आहे का? धोनी पहिल्याच चेंडूवर माघारी परतला असता तर भारताने हा सामना ४० षटकांतच जिंकला असता, असे बोलणाऱ्यांनी सांगावे की धोनी नसता मग एक बाजू टिकून कोण खेळला असता? विजय शंकर की रवींद्र जडेजा? 

या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपी नव्हती, सामन्यानंतर कोहलीने दिलेली ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. धावफलकावर २३० धावा दिसत असल्या तरी परिस्थिती पाहता ती ३०० धावांच्या लक्ष्या इतकीच होती. मग अशा परिस्थितीत खेळपट्टीवर तग धरणे महत्त्वाचे होते आणि त्यासाठी प्रचंड संयम लागतो. तो कोहलीत नव्हता म्हणून धावा व चेंडू यांच्यातील अंतर वाढतेय असे दिसताच तो तणावात आला आणि विकेट देऊन बसला. पण धोनी चिकटून राहिला.. समोर धोनी आहे हे माहित होते म्हणून जाधव मोकळेपणाने खेळला.. त्याच्या अनुभवाची मदत भारताला अनेक कठीण प्रसंगी झालीय.

धोनीचे संघात असणे हे फार आहे, हे रोहित सांगतो. धोनी व्हीलचेअर आला तरी मी त्याला संघात खेळविन, हे दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स सांगतो... पण त्याच्या संथ खेळीने सामना कंटाळवाणा होतोय... कठीण प्रसंगीही चाहत्यांना मोठी फटकेबाजी करणारा खेळाडू आम्हाला हवाय.. मग तो यशस्वी होईल की नाही याची पर्वा नाही. पण त्याने चेंडूंपेक्षा अधिक धावा केल्याच पाहिजे. ही मागणी... आज भारतीय संघात शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आतषबाजी करणारे खेळाडू होते. पण मॅन ऑफ दी सीरिज जिंकला कुणी ३७ वर्षीय धोनीने.. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत धोनी दुसरा अन् रोहित तिसरा राहिला... मग रनमशीन कोहली कुठेय... धावांचा नियम लावला तर त्यालाही विश्रांती द्या... पण धोनीलाच टार्गेट करा... खरचं धोनी तू दमलास, आता तुझी गरज राहिलेली नाही!!!!

 

 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय