Join us  

'विराट'सेनेचा गौरव, आयसीसीचा मानाचा राजदंड सलग तिसऱ्यांदा भारताकडे

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 4:13 PM

Open in App

दुबई : भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखताना कसोटी अजिंक्यपदाचा मानाचा राजदंड तिसऱ्यांदा स्वतःकडे राखण्यात यश मिळवले. यासह भारतीय संघाला 1 मिलियन अमेरिकन डॉलरचे बक्षीसही देण्यात आले. कसोटी क्रमवारीत 116 गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानावर, तर 108 गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचे अव्वल स्थान कायम मानलेच जात होते. पण, न्यूझीलंडने सातत्यपूर्ण कामगिरी करताना विराट कोहलीच्या सेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंडने तिसऱ्या स्थानावरून आगेकूच केली. केन विलियम्सनच्या संघाला 2018च्या आयसीसी स्पीरिट ऑफ क्रिकेट या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना 5 लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस देण्यात आले. दक्षिण आफ्रिका मागील दोन हंगामात कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर होते, परंतु यंदा त्यांना (105)  तिसऱ्या स्थानवर समाधान मानावे लागले आणि त्यामुळे त्यांना 2 लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस देण्यात येणार आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू सव्हनी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. ते म्हणाले,''आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपदाचा मानाचा राजदंड पटकावणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. विराट कोहलीनं क्रिकेटच्या तीनही स्वरूपात ज्या प्रकारे खेळी केली आहे, त्याचे विशेष कौतुक.  

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की,''आयसीसीचा हा राजदंड पुन्हा पटकावल्याचा अभिमान आहे. आमच्या संघाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे आणि हा गौरव त्याच कामगिरीची पोचपावती आहे. कसोटी क्रिकेटचे महत्त्व आम्ही जाणून आहोत.''

टॅग्स :विराट कोहलीआयसीसी