Join us  

भारताने मालिका बरोबरीत सोडवली

सिडनी : कर्णधार विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक आणि कृणाल पांड्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी याच्या जोरावर भारताने रविवारी येथे अंतिम ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 6:44 AM

Open in App

सिडनी : कर्णधार विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक आणि कृणाल पांड्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी याच्या जोरावर भारताने रविवारी येथे अंतिम टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा २ चेंडू व ६ गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. या कामगिरीसह भारताने गेल्या १० महिन्यांपासून अपराजित राहण्याचा पराक्रम या मालिकेतही कायम राखला.आॅस्ट्रेलिया संघाने ब्रिस्बेनमध्ये पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर ४ धावांनी विजय मिळवला होता, तर मेलबोर्नमध्ये दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाचा डाव पांड्याच्या भेदक माºयापुढे ६ बाद १६४ धावांत रोखला गेला. कोहलीच्या नाबाद ६१ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने १९.४ षटकांत ४ बाद १६८ धावा फटकावत विजय साकारला. भारताने सलग दहाव्या मालिकेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला. संघाने यादरम्यान दोन मालिका (दोन्ही आॅस्ट्रेलियाविरुद्ध) अनिर्णीत राखल्या, तर आठ मालिकांमध्ये विजय मिळवला. कोहलीने ४१ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व २ षटकार लगावले, तर दिनेश कार्तिक २२ धावा (१८ चेंडू, १ चौकार, १ षटकार) नाबाद राहिला. सलामीवीर शिखर धवन (४१ धावा, २२ चेंडू, ६ चौकार, २ षटकार) आणि रोहित शर्मा (२३ धावा, १६ चेंडू, १ चौकार, २ षटकार) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी सलामीला ६७ धावांची भागीदारी केली, पण ते दोघेही याच धावसंख्येवर तंबूत परतले. मिशेल स्टार्कने सुरुवातीला धवनला पायचित केले, तर अ‍ॅडम झम्पाने पुढच्या षटकात रोहितला तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर कोहली व लोकेश राहुल (१४) खेळपट्टीवर होते. राहुलला मोठी खेळी करता आली नाही, तर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतही झटपट माघारी परतला. भारताने पुढच्या २ विकेट १०८ धावसंख्येवर गमावल्या. त्यानंतर कोहली व कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची अभेद्य भागीदारी करीत विजय मिळवून दिला.

त्याआधी, भारतासाठी पांड्याचा फिरकी मारा मधल्या षटकात फायदेशीर ठरला. यजमान संघाने नवव्या षटकापर्यंत बिनबाद ६८ धावा केल्या होत्या. पांड्याने ३६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. तो थोडा महागडा ठरला असला तरी भारतासाठी त्याने मोक्याच्या क्षणी बळी मिळवून दिले. अ‍ॅरॉन फिंच (२८) व डॉर्सी शॉर्ट (३३) यांनी सावध सुरुवात केली आणि लवकरच धावांच्या गतीला वेग दिला. येथील परिस्थिती ब्रिस्बेन व मेलबोर्नच्या तुलनेत वेगळी होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना येथे अडचण भासली. बळींचा विचार करता भुवनेश्वर कुमार (३३ धावा) व खलील अहमद (३५ धावा) यांची पाटी कोरीच राहिली, तर जसप्रीत बुमराह (३८ धावांत बळी नाही) यालाही धावगतीवर लगाम लावता आला नाही. आॅस्ट्रेलियाने पॉवर प्ले संपण्यापूर्वी बिनबाद ४९ धावांची मजल मारली होती. फिंच-शॉर्ट यांनी भागीदारी करीत भारतीय संघावर दडपण निर्माण केले. रोहित शर्माने आठव्या षटकाच्या सुरुवातीला पांड्याच्या गोलंदाजीवर फिंचचा झेल सोडला. त्यावेळी आॅस्ट्रेलियाचा हा फलंदाज वैयक्तिक २२ धावांवर खेळत होता. कुलदीप यादवने (१-१९) आॅस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का दिला. त्याने फिंचला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर आॅस्ट्रेलियाची मधली फळी ढासळण्यास सुरुवात झाली. ग्लेन मॅक्सवेल (१३) यादवच्या गोलंदाजीवर डीआरएसच्या माध्यमातून बचावला; पण शॉर्ट व बेन मॅकडरमोट (०) दहाव्या षटकात पांड्याच्या गोलंदाजीवर सलग चेंडूवर पायचित झाले. एकापाठोपाठ विकेट गमावल्यामुळे आॅस्ट्रेलियाने लय गमावली. ख्रिस लिनने (१३) प्रयत्न केला, पण तो १८ व्या षटकात धावबाद झाला.

दरम्यान, पांड्याने मॅक्सवेललाही तंबूचा मार्ग दाखवला, तर अ‍ॅलेक्स कैरीचा (२७) महत्त्वाचा बळीही त्याच्याच खात्यात गेला. मार्कस् स्टोइनिसने (नाबाद २५ धावा, १५ चेंडू) शेवटी आक्रमक खेळी केली आणि नाथन कुल्टर नाईलसोबत (नाबाद १३) ३३ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आॅस्ट्रेलियाभारत