तिरुअनंतपुरम : आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेला भारतीय संघ आपली विजयी लय कायम राखत, खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. विशाखापट्टणम येथे झालेले पहिले दोन्ही सामने अनुक्रमे ८ आणि ७ गडी राखून जिंकत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
गेल्या ११ टी-२० सामन्यांमधील भारताचा हा नववा विजय ठरला आहे. श्रीलंकेने भारताला शेवटचे जुलै २०२४ मध्ये दंबुला येथे पराभूत केले होते. यजमान भारताची फलंदाजी अत्यंत भक्कम असून, दोन्ही सामन्यांत वेगवेगळ्या खेळाडूंनी विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. पहिल्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्सने चमक दाखवली, तर दुसऱ्या सामन्यात शेफाली वर्मा विजयाची शिल्पकार ठरली.
अचूक गोलंदाजीचा मारा
भारताची गोलंदाजीही तितकीच प्रभावी ठरत आहे. फिरकीपटूंनी श्रीलंकेला पहिल्या सामन्यात १२१ आणि दुसऱ्या सामन्यात १२८ धावांवर रोखून धरले. युवा गोलंदाज एन. श्रीचरणी, वैष्णवी शर्मा आणि क्रांती गौड यांनी शिस्तबद्ध आणि प्रभावी मारा केला आहे. अष्टपैलू दीप्ती शर्मा तापामुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकली नव्हती. मात्र, तिच्या जागी आलेल्या स्नेह राणाने ४ षटकांत केवळ ११ धावा देत १ बळी घेतला.
क्षेत्ररक्षण सुधारण्याची गरज
टीम इंडियाला क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. पहिल्या सामन्यात भारताकडून पाच झेल सुटले होते; मात्र दुसऱ्या सामन्यात संघाने श्रीलंकेच्या तीन
खेळाडूंना धावबाद करत पुनरागमन केले. संघ पुढील तीन सामन्यांत कामगिरीत अधिक सुधारणा करण्यास उत्सुक आहे.
स्मृती मानधनाकडून दमदार फलंदाजीची असेल अपेक्षा...
श्रीलंकेसमोर आव्हान दुसऱ्या सामन्यात चामरी अटापट्टू बाद झाल्यानंतर श्रीलंकेने अवघ्या २६ धावांत ६ गडी गमावले. दोन्ही संघांच्या कामगिरीत सध्या मोठी तफावत दिसून येत आहे.