भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी धर्मशाला येथे खेळला जात असलेला सामना अर्ध्यातच थांबवण्यात आला. त्यानंतर आयपीएल यंदाचा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. परंतु, यामुळे आयपीएले रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर भारतीय क्रिकेट मंडळ मंडळ म्हणजेच बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे.
बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने फक्त एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित अधिकारी आणि भागधारकांशी सल्लामसलत करून परिस्थितीचा व्यापक आढावा घेतल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत पुढील अपडेट्स योग्य वेळी जाहीर केले जातील. आयपीएल स्थगित केल्याची माहिती समजल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. त्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सर्व प्रमुख भागधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर एक आठवड्यानंतर पुन्हा स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय देशाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.'
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेले विदेशी खेळाडू चिंतेत आहेत. त्यामुळेच बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले जात आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत ५८ सामने खेळवण्यात आले. साखळी सामन्यातील अजून १२ सामने खेळले जाणार आहेत. दरम्यान, २२ मार्चपासून सुरू झालेल्या आयपीएल २०२५ मध्ये एकूण १० संघ सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या वेळापत्रकानुसार, २५ मे २०२५ रोजी कोलकाता येथील ईडन गार्डनवर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे.