वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स(WCL) मध्ये होणारा भारत-पाकिस्तान सामना आता रद्द करण्यात आला आहे. या सामन्यावरून बराच वाद निर्माण झाला. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या या सामन्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता आयोजकांनी यावर स्पष्टीकरण देत भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची घोषणा केली आहे.
या सामन्यातून शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण यासारख्या खेळाडूंनी पाकिस्तानविरोधात सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन याने ११ मे रोजी आयोजकांना ईमेलद्वारे सामना खेळणार नसल्याचे सांगितले. भारतीय खेळाडूंनी देशहिताला प्राधान्य देत सामन्यातून माघार घेत आयोजकांना सामना रद्द करण्यास भाग पाडले आहे. आयोजकांनी याबाबत पत्रक काढून जाहीर माफीही मागितली आहे.
WCL आयोजकांनी काय म्हटलं?
WCL नेहमी क्रिकेटवर खूप प्रेम करते, प्रेक्षकांना काही चांगले आणि आनंदी क्षण देणे हा आमचा एकमेव उद्देश असतो. यावर्षी पाकिस्तानी हॉकी टीम भारतात येणार आहे, त्याशिवाय अलीकडेच भारत-पाकिस्तान यांच्यात व्हॉलीबॉल सामन्यासह इतर अन्य खेळांचे सामने झाले आहेत हे जेव्हा आम्हाला कळले, तेव्हा आम्ही WCL मध्ये भारत-पाकिस्तान सामना आयोजित करून प्रेक्षकांसाठी विस्मरणीय आणि आनंदाचे क्षण तयार करण्याचा विचार केला. परंतु कदाचित या प्रक्रियेत आम्ही अनेक लोकांच्या भावना दुखावल्या. अनावधानाने काहींच्या संवेदना भडकावल्या. त्याहून अधिक आम्ही भारतीय क्रिकेट दिग्गजांना अस्वस्थ स्थितीत टाकले ज्यांनी देशाला कायम मानाचे स्थान दिले. सोबतच आम्ही त्या ब्रँडसना दुखावले जे केवळ खेळावरील प्रेमापोटी आम्हाला पाठिंबा देतात म्हणूनच आम्ही भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितले.
आयोजकांनी मागितली माफी
आम्ही ज्या प्रेक्षकांच्या, खेळाडूंच्या भावना दुखावल्या त्यांची मनापासून माफी मागतो. हे लोक आम्हाला समजून घेतील की आमचा एकमेव हेतू क्रिकेट चाहत्यांना आनंदाचे काही क्षण देण्याचा होता असं आयोजकांनी म्हटलं. तर WCL आयोजकांनी घेतलेल्या निर्णयावर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले आहे. संघर्षाच्या काळात ज्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यांना विरोध केला, हा सामना रद्द होण्यासाठी आवाज उचलला त्या सर्वांचे आभार मानले आहेत. WCL च्या या निर्णयामुळे आता भारत पाकिस्तान वगळता इतर देशांसोबत सामने खेळणार आहे.