भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करत असताना यशस्वीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग सामन्यानंतर यशस्वीने पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. वेदना असह्य झाल्यामुळे त्याला तातडीने तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या प्रकृतीचा अंदाज घेण्यासाठी सीटी स्कॅन आणि अल्ट्रासाऊंड चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.
यशस्वी जैस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने ७८ च्या सरासरीने १५६ धावा कुटल्या होत्या, ज्यात त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकाचाही समावेश आहे. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने ३ सामन्यांत १४५ धावा करत आपला दबदबा कायम ठेवला. जबरदस्त फॉर्मात असतानाच त्याची प्रकृती बिघडल्याने चाहत्यांनी आपल्या भुवया उंचावल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार का?
यशस्वीच्या प्रकृतीमुळे आता तो आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी फिट असेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारताची न्यूझीलंडविरुद्धची मालिका जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. त्यापूर्वी, २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी मध्ये तो खेळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा देखील काही सामने खेळणार आहे, त्यामुळे यशस्वी आणि रोहित ही जोडी पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
यशस्वीच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आल्यानंतरच त्याच्या प्रकृतीबाबत अधिक स्पष्टता येईल. बीसीसीआयचे वैद्यकीय पथकही त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. लवकरच तो बरा होऊन मैदानात परतेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.