Join us

Sachin Tendulkar, BCCI: 'क्रिकेटच्या देवा'कडून 'बीसीसीआय'च्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक, म्हणाला...

भारतीय क्रिकेट संघातील स्त्री-पुरूषांना मिळणार समान मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 21:28 IST

Open in App

Sachin Tendulkar, BCCI: भारतीय संघ टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत व्यस्त असतानाच, भारतीय क्रिकेट BCCI चे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. जय शाह यांच्या ट्विटनुसार आता भारतीय महिला क्रिकेटपटूंना पुरुषांइतकेच वेतन मिळणार आहे. न्यूझीलंडने तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या महिला व पुरुष क्रिकेटपटूंसाठी समान वेतन जाहीर केले होते. त्याचप्रमाणे BCCI ने हा निर्णय जाहीर केला. जय शाह यांनी ट्विट केले की, भेदभावाचा सामना करण्यासाठी BCCIने पहिले पाऊल टाकले आहे आणि त्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण लागू करत आहोत. क्रिकेटमधील समानतेच्या नवीन युगात जात असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल. या निर्णयानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने निर्णयाचे कौतुक केले. (men women cricketers to get equal match fees)

महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणेच मॅच फी दिली जाईल. कसोटीसाठी १५ लाख, वन डे साठी ६ लाख आणि ट्वेंटी-२० साठी ३ लाख) दिले जातील. समान वेतन ही आमच्या महिला क्रिकेटपटूंप्रती माझी बांधिलकी होती आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी सर्वोच्च परिषदेचे आभार मानतो. जय हिंद, असे जय शाह यांनी ट्विट केले. त्यावर सचिनने ट्वीट केले. "क्रिकेट हा अनेक प्रकारे समानता दर्शवणारा खेळ आहे. स्त्री-पुरूष समानता याच्या दृष्टीने हा निर्णय खूपच कौतुकास्पद आणि स्वीकारार्ह आहे. खेळातील भेदभाव मिटवण्यासाठी हा खरंच खूप चांगला निर्णय आहे. BCCIने घेतलेल्या निर्णयामुळे मी आनंदी आहे. जय शाह, भारतीय क्रिकेटमधील अशा चांगल्या बदलांकडे आमचे नेहमीच लक्ष असेल," असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले.

दरम्यान, जय शाह यांनी ही मोठी घोषणा केल्यावर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आभार मानले आहेत. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. "महिला आणि पुरुषांसाठी वेतनाच्या समानतेच्या निर्णयामुळे भारतातील महिला क्रिकेटसाठी खरोखरच आनंदाचा दिवस आहे. बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार", अशा आशयाचे ट्विट करून हरमनप्रीत कौरने आभार मानले. तर मराठमोळ्या स्मृती मानधनाने भारतातील महिला क्रिकेटसाठी किती आनंददायी बातमी आहे, असे ट्विट करून जय शाह यांच्या निर्णयावरून आनंद व्यक्त  केला.

टॅग्स :बीसीसीआयसचिन तेंडुलकरजय शाह
Open in App