भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० क्रिकेट मालिका आता १-१ अशा बरोबरीत आली असून अखेरचा सामना शुक्रवारी अंतिम सामन्याप्रमाणे खेळण्यात येईल. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात बाजी मारत आॅस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन केले. खूप कमी
धावसंख्येत भारताचा डाव संपुष्टात आणल्यानंतर आॅसीने सहजपणे विजय मिळवला. विशेष म्हणजे डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच
प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्यानंतरही आॅसीने शानदार विजय मिळवला. या दोघांच्या विकेट गेल्यानंतर असे वाटत होते,
की आॅस्ट्रेलिया पुन्हा एकदा भारतीयांच्या सापळ्यात अडकणार, पण असे झाले नाही.
पहिल्या सामन्यात चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात आॅस्ट्रेलियाला अपयश आले. शिवाय पावसानेही सामन्यात व्यत्यय आणले. भारताने त्या सामन्यात चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करीत आॅस्ट्रेलियाची वेगवान कूच रोखली होती. फलंदाजीतही मिळालेले छोटेखानी लक्ष्य सहजपणे मिळवल्यावर असे वाटत होते, की पुन्हा एकदा आॅसीला क्लीन स्वीप देण्याची भारताला संधी मिळेल. पण, दुसरा सामना जिंकून आॅस्ट्रेलियाने असे होऊ दिले नाही.
जेसेन बेहरनडॉर्फ या उंचापु-या डावखु-या गोलंदाजाने अप्रतिम मारा करीत आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये चार षटके मारा करत
चार प्रमुख बळी मिळवले. खेळपट्टीचाही काही प्रमाणात गोलंदाजांना फायदा झाला. पण तरीही गुवाहाटीच्या खेळपट्टीवर १४०-१५० धावा समाधानकारक ठरल्या असत्या. त्यामुळे ११८ धावा खूप कमजोर पडल्या. पण आॅस्ट्रेलियाच्या विजयाचे विशेष म्हणजे पुन्हा एकदा वॉर्नर-फिंच झटपट परतल्यानंतर मोझेस हेन्रिक्स आणि ट्रॅव्हिस हेड यांनी लक्षवेधी फलंदाजी केली. तसेच, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव
ही जोडी अपयशी ठरली. त्यामुळे तिस-या सामन्यात या गोष्टीचा भारतीय संघावर मानसिक परिणाम होईल का, हे पाहावे लागेल.
खेळाव्यतिरिक्त सांगावंसं वाटतं, की हे सर्व झाल्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या बसवर दगडफेक झाली, ती खूप लज्जास्पद बाब आहे, हे भारतीयांना अजिबात शोभून दिसत नाही. भारतीय नक्कीच क्रिकेटप्रेमी आहेत, पण हीच गोष्ट बाहेरच्या देशात भारतीय संघासोबत झाली असती, तर खूप मोठा गदारोळ झाला असता. त्यामुळे माझ्या मते हे अत्यंत चुकीचे आणि लज्जास्पद वर्तन होते.