बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदाच ऐतिहासिक टी २० मालिकाविजय साजरा करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला अखेरच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. मात्र आधीच विजय आघाडी घेतलेल्या टीम इंडियाने ही मालिका ३-२ ने खिशात घातली. शनिवारी झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात यजमान इंग्लंडने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत सामना ५ विकेट्सने जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना शेफाली वर्माच्या आक्रमक ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर ७ बाद १६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने शेवटच्या चेंडूवर पाच विकेट राखून हे लक्ष पार केले.
उपकर्णधार स्मृती मानधनाने सलग दोन चौकार मारून भारताला दमदार सुरुवात करून दिली होती. मात्र त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर स्मृतीने लिन्से स्मिथकडे झेल दिला. जेमिमा रॉड्रिग्जही केवळ १ धाव करून लिन्सेच्या चेंडूवर त्रिफळाचित झाली. २ बाद १९ अशा अवस्थेत शेफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (१५) यांनी भारताचा डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ६६ धावांची भागीदारी केली. चार्ली डीनने हरमनप्रीतला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर हरलीन देओलही केवळ ४ धावांवर सोफी एक्लेस्टोनचा शिकार ठरली. शेफालीने मात्र एक बाजू लावून धरली होती. सातव्या षटकात तिने वेगवान गोलंदाज इसी वोंगला तीन चौकार आणि एका षटकारासह २० धावांचा प्रसाद दिला. शेफालीने २३ चेंडूत भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी शेफालीने ४१ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकारासह ७५ धावांची झंझावाती खेळी केली. यानंतर यष्टिरक्षक रिचा घोषने १६ चेंडूत २४ आणि राधा यादवने १४ चेंडूत १४ धावा करत भारताला शेवटच्या ४१ चेंडूत ५६ धावा जोडून दिल्या.
१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीर सोफिया डंक्ले (४६) आणि डॅनियली वॉट हॉज (५६) यांनी केवळ १०.४ षटकांत १०१ धावांची भागीदारी करून शानदार सुरुवात केली. भारताने या दोघांनी बाद केल्यानंतर पुनरागमनाचा प्रयत्न केला खरा पण कर्णधार टॅमी ब्युमोंट (३०) आणि माय्या बूचियर (१६) यांनी इंग्लंडचा विजय दृष्टिपथात आणला.
अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी ६ धावांची गरज होती. अरुंधती रेड्डीने ब्युमोंट आणि एमी जोन्सला बाद करत आशा निर्माण केल्या, पण एक्लेस्टोन आणि पेज स्कोफील्डने इंग्लंडला शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळून दिला. आता दोन्ही संघांमध्ये १६ जुलैपासून साउथॅम्प्टन येथे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळविली जाणार आहे.