Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिस्बेनमधून चौथी कसोटी हलविण्याची भारताने विनंती केली नाही

निक हॉकले : विलगीकरण नियमांबाबत नाराजीचे माध्यमांनी दिलेले वृत्त खोडसाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 05:22 IST

Open in App

सिडनी : ‘विलगीकरणाबाबत असलेल्या कठोर नियमांमुळे भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळू इच्छित नाही,’ या स्थानिक माध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्ताचा इन्कार करीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी निक हॉकले यांनी १५ जानेवारी रोजी ब्रिस्बेन येथे सुरू होणारी चौथी तसेच अखेरची कसोटी इतरत्र हलविण्याची भारतीय संघाने विनंती केली नाही, असे स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयला क्वीन्सलॅन्डमधील विलगीकरण नियमांची चांगली जाण आहे. भारताने सध्याच्या दौऱ्यात आतापर्यंत योग्य सहकार्यदेखील केले आहे. आम्ही बीसीसीआय अधिकाऱ्यांसोबत दररोज चर्चा करतो. त्यांच्याकडून अशी कुठलीही औपचारिक सूचना अथवा विनंती आलेली नाही. आम्ही जे वेळापत्रक तयार केले, ते दोन्ही बोर्डांना विश्वासात घेऊनच तयार केले, असे हॉकले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. चार कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असून, तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनी मैदानावर खेळला जाईल.

‘ब्रिस्बेन मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ उत्सूक नाही. तेथील वलगीकरणाच्या कठोर नियमांवर खेळाडू नाराज आहेत. ऑस्ट्रेलियात दाखल होताच आम्ही आधी १४ दिवस विलगीकणात होतो,’ असे खेळाडूंचे मत असल्याने ब्रिस्बेन कसोटीचे आयोजन अधांतरी असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले होते.’ 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया