Join us

४५० धावांचे लक्ष्यदेखील गाठू शकतो: शार्दुल ठाकूर

क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे, असे शार्दुल ठाकूर याने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 08:02 IST

Open in App

- अभिजित देशमुख, लंडन: डब्ल्यूटीसी फायनलच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड वाटत असले तरी भारत ४५० धावांचे लक्ष्यदेखील गाठू शकतो, असे सांगून अष्टपैलू शार्दुल ठाकूर याने कांगारूंची झोप उडवून दिली. शार्दुलने ऑस्ट्रेलियाला अधिकाधिक धावा काढण्याचे अप्रत्यक्ष आव्हान दिले. त्याच्या मते, भारतीय संघ ४५० धावांचे लक्ष्य गाठण्यास सज्ज असेल.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद १२३ धावा केल्या. चौथ्या दिवशी १४७ धावांची भर घालून सामना जिंकण्यासाठी भारताला ४४४ धावांचे लक्ष्य दिले आहे. याविषयी विचारताच शार्दुल म्हणाला, ‘ओव्हलवर केवळ एक चांगली भागीदारी होण्याची गरज आहे. त्या बळावर ४५० काय, त्याहून अधिक धावांचे लक्ष्यदेखील गाठता येऊ शकेल.’ क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे, असे सांगून शार्दुल पुढे म्हणाला, ‘एखादा आकडा योग्य धावसंख्या आहे, हे कसोटी क्रिकेटमध्ये ठामपणे सांगता येणार नाही. मोठे लक्ष्य असेल तरी एक मोठी भागीदारी झाल्यास लक्ष्य गाठणे सोपे होते.’

शार्दुलने पहिल्या डावात ५१ धावा ठोकल्या, शिवाय रहाणेसोबत सातव्या गड्यासाठी शतकी भागीदारीही केली होती. या दोघांमुळे भारताला फॉलोऑन टाळण्यात यश आले होते. 

खेळपट्टीबाबत शार्दुल म्हणाला, ‘खेळपट्टी खूप वेगळी दिसते. गेल्या वेळी जेव्हा आम्ही ओव्हलवर कसोटी खेळलो तेव्हा खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत होती. इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरण असेल तर चेंडू नक्कीच स्विंग होईल, हे सर्वांना माहीत होते.  असे वाटते की खेळपट्टी सामन्यासाठी पूर्णपणे तयार नाही. असमान उसळी, चेंडू कधी स्विंग होत नाही तर कधी कधी इतका होतो की वाइड जातो. काही चेंडू वर जात होते तर काही खाली राहिले होते.’ 

टॅग्स :शार्दुल ठाकूर
Open in App