Join us

त्रिकोणीय टी-२० मालिकेत भारताकडून विंडीजचा धुव्वा

India Vs West Indies: गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने त्रिकोणीय टी-२० मालिकेच्या अखेरच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजचा ८ बळींनी धुव्वा उडवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 06:49 IST

Open in App

लंडन : गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने त्रिकोणीय टी-२० मालिकेच्या अखेरच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजचा ८ बळींनी धुव्वा उडवला. प्रथम गोलंदाजी करत विंडीजला २० षटकांत ६ बाद ९४ धावांवर रोखल्यानंतर भारतीयांनी १३.५ षटकांमध्येच २ बाद ९५ धावा करून बाजी मारली. याआधीच, भारत आणि दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केल्याने हा सामना औपचारिकतेचा ठरला होता. यामध्ये एकतर्फी वर्चस्व राखत भारतीयांनी चांगला सराव करून घेतला. दीप्ती शर्माने केवळ ११ धावांत तीन खंदे फलंदाज बाद करत विंडीजच्या फलंदाजीतील हवा काढली. 

यानंतर गेल्या काही सामन्यांमध्ये लय गमावलेल्या  जेमिमा रॉड्रिग्जने शानदार फटकेबाजी करत फॉर्म मिळवला. तिने ३९ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ४२ धावा करत भारताचा विजय सोपा केला. स्टार फलंदाज स्मृती मानधना (५) आणि हरलीन देओल (१३) अपयशी ठरल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने २३ चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद ३२ धावा करत जेमिमाला चांगली साथ दिली. दोघींनी तिसऱ्या बळीसाठी नाबाद ५४ धावांची भागीदारी करत भारताचा विजय स्पष्ट केला.

त्याआधी, दीप्तीने विंडीजची फिरकी घेताना त्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. पूजा वस्त्राकारनेही १९ धावांत २ बळी घेत दीप्तीला चांगली साथ दिली. राजेश्वरी गायकवाडने एक बळी घेतला. कर्णधार हायली मॅथ्यूने विंडीजकडून एकाकी झुंज देताना ३४ चेंडूंत ३४ धावा करताना ५ चौकार मारले. झायदा जेम्सने ३१ चेंडूंत २ षटकारांसह नाबाद २१ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक :वेस्ट इंडिज : २० षटकांत ६ बाद ९४ धावा (हायली मॅथ्यू ३४, झायदा जेम्स नाबाद २१; दीप्ती शर्मा ३/११, पूजा वस्त्राकार २/१९.) पराभूत वि. भारत : १३.५ षटकांत २ बाद ९५ धावा (जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद ४२, हरमनप्रीत कौर नाबाद ३२; हायली मॅथ्यू १/७, शामिलिया कॉनेल १/१७.) 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App