पोर्ट एलिझाबेथ - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने आज नवा इतिहास रचला. पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारतानं 73 धावांनी विजय मिळवत वनडे मालिकेवर 4-1 ने कब्जा मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमधील भारताचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला. टीम इंडियाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली.
भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दिलेलं 275 धावांचं आव्हान पार करताना आफ्रिकन फलंदाजांची पुरती दमछाक उडाली आहे. अमला एकाकी झुंज देत दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी प्रयत्नशील होता. पण तो 71 धावांत बाद झाला आणि भारताचं पारडं जड झालं. टीम इंडियाकडून कुलदीपने 57 धावांत चार फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
‘हिटमॅन’ रोहित शर्माने (115) झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निर्धारित 50 षटकांत 7 बाद 274 अशी समाधानकारक मजल मारली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर झटपट तीन बळी गेल्याने भारताला तीनशे धावांची अपेक्षित मजल मारता आली नाही. लुंगी एनगिडीने रोहित शर्मासह चार महत्त्वपूर्ण बळी घेत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
सेंट जॉर्ज पार्क मैदानावर नाणेफेक जिंकून ऐडन मार्करम याने भारताला फलंदाजीला निमंत्रित केले. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आक्रमक फटकेबाजी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, कागिसो रबाडाने आखूड टप्प्याचा चेंडू टाकून धवनला फाइन लेगला झेल देण्यास भाग पाडून भारताला मोठा झटका दिला.
धवन 23 चेंडूंत 8 चौकारांसह 34 धावा काढून परतला. यानंतर रोहितने कर्णधार विराट कोहलीसह 105 धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. रोहित चांगली फटकेबाजी करीत असल्याचे पाहून कोहलीने त्याला जास्तीत जास्त स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक धाव घेताना झालेल्या गोंधळामुळे कोहली धावबाद झाला. त्याने 54 चेंडूंत 36 धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणेही (8) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला.