नवी दिल्ली : विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत-न्यूझीलंड यांच्यात साउदम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत खेळविण्यात येणार आहे. या सामन्यासाठी काय नियम आणि अटी (प्लेइंग कंडिशन्स) राहतील हे अद्याप ठरलेले नाही. सामना अनिर्णीत राहिल्यास, टाय झाल्यास किंवा सामन्यात पाऊस आल्यास काय होईल? याबाबतचे नियम आयसीसीकडून लवकरच निश्चित केले जातील.
भारतीय संघाच्या संपर्कात असलेल्या एका अधिकाऱ्याने स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ही द्विपक्षीय मालिका नाही. हा कसोटी अंतिम सामना असेल. त्यामुळे परिस्थिती आणि त्यावर तोडगा याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आयसीसी लवकरच नियम आणि अटी जाहीर करील, असा विश्वास आहे.
भारतीय संघ २ जून रोजी लंडनमध्ये दाखल होताच साउदम्पटनमध्ये क्वारंटाइन होणार आहे. क्वारंटाइन नियमदेखील लवकरच जाहीर होणार आहेत. क्वारंटाइन कालावधीत सरावाची संधी मिळावी यासाठीदेखील बीसीसीआय चर्चा करीत आहे.
मिताली, हरमन यांनी मानले बीसीसीआयचे आभार
भारतीय पुरुष संघ इंग्लंडला चार्टर्ड विमानाने जाणार आणि महिला संघाला मात्र साधारण विमानाने प्रवास करावा लागणार, अशा आशयाचे वृत्त मीडियात प्रकाशित होताच बीसीसीआय पुरुष आणि महिला खेळाडूंमध्ये भेदभाव करीत असल्याची टीका झाली. याची दखल घेत इंग्लंडकडे प्रस्थान करण्यासाठी बीसीसीआयने दोन्ही संघांसाठी चार्टर्र विमानाची व्यवस्था केली. त्याआधी घरी कोरोना लस आणि घरून मुंबईपर्यंत येण्याची विमानव्यवस्थादेखील केली. याबद्दल महिला संघातील ज्येष्ठ खेळाडू मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी बोर्डाचे आभार मानले.
भारतीय खेळाडूंना दुसरा डोस इंग्लंडमध्ये
भारतीय क्रिकेट संघ चार महिने इंग्लंडचा दौरा करणार आहे. यादरम्यान त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस तेथेच देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भारतीय खेळाडूंनी प्रस्थान करण्याआधी कोविशिल्ड लस घेतली आहे. कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसची व्यवस्था आता ब्रिटनमध्ये होईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
खेळाडू मुंबईत दाखल
इंग्लंडकडे रवाना होण्याआधी भारतीय खेळाडू २४ मे रोजी मुंबईत बायोबबलमध्ये प्रवेश करतील. मयंक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन आणि गोलंदाजी कोच भरत अरुण, मोहम्मद सिराज, क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर, महिला संघाची कर्णधार मिताली राज हे बुधवारी चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल झाले. मुंबई आणि पुण्याजवळचे खेळाडू २४ मे रोजी येथे पोहोचणार आहेत. त्यात अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आदींचा समावेश आहे.
क्वारंटाईनमध्ये हवी शिथिलता
बीसीसीआयने ईसीबीकडे भारतीय खेळाडूंना क्वारंटाईनदरम्यान सरावाची अधिक संधी मिळावी यासाठी नियम शिथिल करण्याची
मागणी केली आहे. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याआधी भारतीय खेळाडू मैदानावर पुरेशी तयारी करू शकतील, असा यामागील तर्क आहे. त्यासाठी दोन्ही बोर्डांदरम्यान चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.