सध्या भारतात सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वारंवार पावसाचा व्यत्यय आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक लढती रद्द कराव्या लागल्या आहेत. आज भारत आणि बांगलादेश यांच्यात नवी मुंबईमध्ये झालेला शेवटचा साखळी सामनाही पूर्ण होऊ शकला नाही. मात्र भारतीय संघाने आधीच उपांत्य फेरी गाठलेली असल्याने या निकालाचा भारतीय संघाला फटका बसला नाही. आता ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. हा सामनाही नवी मुंबईत होणार असून, या सामन्यावेळीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे ही लढत रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या लढतीवेळी नवी मुंबईमध्ये पावसाची ८० टक्के शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बहुतांश वेळा बाद फेरीमधील लढतींसाठी अतिरिक्त दिवसाची व्यवस्था केलेली असते. त्याचप्रमाणे या विश्वचषक स्पर्धेतही उपांत्य आणि अंतिम फेरीचया सामन्यांसाठी राखीव दिवसाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय आला किंवा सामना होऊ कला नाही तर हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल.
मात्र राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही तर अंतिम फेरीत कोण जाईल हे निश्चित करण्याची व्यवस्थाही करून ठेवण्यात आली आहे. त्यानुसार जर सामन्याच्या दिवशी आणि राखीव दिवशी अशा दोन्ही दिवसांत मिळून सामना होऊ शकला नाही तर साखळी फेरीत चांगली कामगिरी करणारा संघ पुढच्या फेरीत जाईल, याचाच अर्थ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना पूर्ण खेळवला गेला नाही तर ऑस्ट्रेलियन संघ थेट अंतिम फेरीत जाईल.
ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आपले साखळीतील सातपैकी सहा सामने जिंकले होते. तर एक सामना हा पावसामुळे पूर्ण होऊ शकलेला नव्हता. दुसरीकडे भारतीय संघाने सात पैकी केवळ ३ सामन्यात विजय मिळवला, तर ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला, एक सामना पावसामुळे अनिकाली राहिला. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीत पाऊस पडून सामना रद्द झाल्यास भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान तिथेच संपुष्टात येईल.