नवी दिल्ली : येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि आॅस्ट्रेलिया अखेरचा वन-डे खेळले त्या वेळी सध्या उभय संघांचे कर्णधार असलेले विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांचा जन्मही झाला नव्हता; शिवाय रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरसारखे खेळाडू त्या वेळी आईच्या कुशीत दूध पीत असावेत.
सध्याच्या मालिकेतील पहिला सामना चेपॉकवर १७ सप्टेंबरला खेळला जाईल. उभय संघांत ३० वर्षांनंतर येथे वन-डे लढत खेळली जाईल. याआधी ९ आॅक्टोबर १९८७ मध्ये उभय संघ वन-डे खेळले. चेपॉक मैदानावर झालेला तो पहिलाच आंतरराष्ट्रीय वन-डे होता.
आतापर्यंत एकूण २० वन-डे या मैदानावर खेळविण्यात आले; पण भारत-आॅस्ट्रेलिया संघ कधीही परस्परांपुढे आले नव्हते. आॅस्ट्रेलियाने तेव्हापासून या मैदानावर झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन वन-डे खेळले. भारताने या मैदानावर एकूण ११ सामने खेळले. त्यापैकी सहा जिंकले, तर चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. भारत-आॅस्ट्रेलियादरम्यान ९ आॅक्टोबर १९८७ मध्ये रिलायन्स विश्वचषकाचा सामना झाला होता. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने आधी फलंदाजी करीत जेफ मार्शच्या शतकी खेळीच्या बळावर (११० धावा) ५० षटकांत ६ बाद २७० धावा उभारल्या. के. श्रीकांत (७०) आणि नवज्योत सिद्धू (७३) यांच्या अर्धशतकांमुळे भारत विजयाच्या दारात होता. तथापि, अखेरचे सात फलंदाज ४० धावांत गमावल्याने सामना अवघ्या एका धावेने गमवावा लागला.
आॅस्ट्रेलियाने नंतर या मैदानावर सर्वच सामने सहजपणे जिंकले. याचा अर्थ या मैदानावर आॅस्ट्रेलियाच्या यशाचा रेकॉर्ड १०० टक्के आहे. १९९६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध या संघाने अखेरचा वन-डे खेळला होता.
भारत-आॅस्ट्रेलियाने चेपॉकवर चार कसोटी सामने खेळले. त्यापैकी तीन सामने भारताने जिंकले. एक सामना बरोबरीत सुटला. भारताने १९९८, २००१ आणि २०१३ मध्ये विजय नोंदविले, तर २००४ मध्ये झालेला सामना बरोबरीत राहिला. (वृत्तसंस्था)
भारत-आॅस्ट्रेलिया वन डे रेकॉर्ड
कोलकाता : सध्याच्या मालिकेत ईडन गार्डनवर २१ सप्टेंबर रोजी दुसरी वन-डे होईल. १८ नोव्हेंबर २००३ नंतर दोन्ही संघ दुस-यांदा समोरासमोर येत आहेत. त्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने ३७ धावांनी बाजी मारली होती.
इंदूर : २४ सप्टेंबर रोजी होळकर स्टेडियमवर उभय संघांदरम्यान होणारा हा पहिलाच सामना असेल. आॅस्ट्रेलिया संघ शहरात प्रथमच येत आहे.
बंगळुरू : चिन्नास्वामी स्टेडियमवर २८ सप्टेंबर रोजी चौथी वन-डे होईल. या मैदानावर उभय संघांदरम्यान सहा सामने खेळले गेले. त्यापैकी भारताने चार आणि आॅस्ट्रेलियाने एक सामना जिंकला. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. २०१३ ला झालेला अखेरचा सामना भारताने ५७ धावांनी जिंकला होता.
नागपूर : पाचवा आणि अखेरचा सामना व्हीसीए जामठा स्टेडियमवर १ आॅक्टोबर रोजी खेळला जाईल. गेल्या आठ वर्षांत उभय संघ दोनदा एकमेकांविरुद्ध खेळले. दोन्ही वेळा आॅस्ट्रेलियासाठी व्हीसीएची खेळपट्टी कर्दनकाळ ठरली. भारताने २००९ मध्ये ९९ धावांनी तसेच २०१३ मध्ये सहा गड्यांंनी विजय साजरा केला. या सामन्यात धवन आणि कोहली यांनी शतके झळकविली होती. भारताने ३५१ धावांचे लक्ष्य अखेरच्या षटकात गाठले होते.
आकडेवारी काय सांगते...?
९ आॅक्टोबर १९८७ मध्ये उभय संघ वन-डे खेळले चेपॉक मैदानावर झालेला तो पहिलाच आंतरराष्टÑीय वन-डे होता
20 चेपॉकवर एकूण २० वन-डेचे आयोजन
30 भारत-आॅस्ट्रेलिया ३० वर्षांनंतर प्रथमच आमने-सामने
11 भारताने येथे ११ सामने खेळले, सहा जिंकले
04 आॅस्ट्रेलियाने चार सामने खेळले, चारही जिंकले