Join us  

गोलंदाजांच्या कामगिरीने भारत चांगल्या स्थितीत, बुमराहने केली कमाल

Indian Cricket : जसप्रीत बुमराह याने कारकिर्दीत झळकावलेल्या पहिल्या अर्धशतकाच्या मदतीने भारतीय जलदगती गोलंदाजांनी दुसऱ्या दिवस रात्र सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया ए वर वर्चस्व राखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 4:55 AM

Open in App

सिडनी : जसप्रीत बुमराह याने कारकिर्दीत झळकावलेल्या पहिल्या अर्धशतकाच्या मदतीने भारतीय जलदगती गोलंदाजांनी दुसऱ्या दिवस रात्र सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया ए वर वर्चस्व राखले. सिडनी मैदानात बुमराहने आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया ए चे फलंदाज धावा काढताना संघर्ष करताना दिसले. भारताने कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या प्रमुख खेळाडूंना या सामन्यात विश्रांती दिली होती. त्यांचे अन्य प्रमुख फलंदाज चांगला खेळ करु शकले नाही. कोहली आणि पुजाराच्या  अनुपस्थितीमध्ये भारताची मधली फळी कोलमडून पडली. भारताने २१ धावांमध्येच सात गडी गमावले. भारताचा स्कोअर दोन बाद १०२ होता नंतर हाच स्कोअर ९ बाद १२३ झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ १९४ धावांवर पोहचला तो बुमराहमुळे त्याने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याने मोहम्मद सिराज (२२)सोबत दहाव्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमी याने ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी बाद केली. त्याच्या शानदार गोलंदाजीने ऑस्ट्रेलिया ए चा संघ १०८ धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने यात पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी घेतली आहे. शमीने २९ धावा देत तीन बळी घेतले. बुमराह (३३ धावांत दोन) याने अपेक्षेनुसार गोलंदाजी केली तर नवदीप सैनी याने १९ धावा देत तीन व सिराज याने एक बळी घेतला. भारताचा डाव ४८.३ षटकांपर्यंत चालला तर ऑस्ट्रेलिया ए चा संघ ३२.२ षटकांतच बाद झाला. भारताने मयांक अग्रवाल (२) याने चुकीचा फटका खेळत आपली विकेट बहाल केली. त्यानंतर पृथ्वी शॉ (४०) आणि शुभमन गिल (४३) यांनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही. हे दोन्ही खेळाडू पहिल्या दिवस रात्र कसोटी सामन्यात मयांक अग्रवाल याच्यासोबत सलामीला खेळण्याचे दावेदार आहेत. मात्र त्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत असल्याप्रमाणे फलंदाजी केली. हनुमा विहारी लवकर बाद झाला. तेथूनच भारतीय संघ अडखळला. त्यानंतर गिल, रहाणे, रिषभ पंत,रिद्धीमान साहा हे लवकर बाद झाले. एबोट आणि विल्डरमूठ यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.  

संक्षिप्त धावफलकभारत एकूण ४८.३ षटकांत १९४ धावा पृथ्वी शॉ ४०, शुभमन गिल ४३, हनुमा विहारी १५, जसप्रीत बुमराह ५५, मोहम्मद सिराज २२, गोलंदाजी सीन ॲबॉट - ३/४६, जॅक विल्डरमूठ ३/१३. ऑस्ट्रेलिया एकूण ३२.२ षटकांत १०८ धावा मार्क हॅरीस २६, ॲलेक्स कॅरी ३२, निक मॅडिन्सन १२, गोलंदाजी - मोहम्मद शमी ३/ २९, बुमराह २/३३, सिराज १/२६, नवदीप सैनी ३/१९. ग्रीनला कनकशन, बुमराहच्या गोलंदाजीवर दुखापतसिडनी : ऑस्ट्रेलियन कसोटी संघात स्थान मिळविण्याचा दावेदार अष्टपैलू कॅमरन ग्रीनच्या डोक्याला शुक्रवारी येथे भारत ‘अ’ संघाविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहच्या स्ट्रेट ड्राइव्हवर दुखापत झाली. तो दिवसाचा दुसरा स्पेल टाकत असताना बुमराहने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारला. त्याला चेंडूच्या रेषेतून बाहेर पडता आले नाही. चेंडू त्याच्या हाताला लागून डोक्याच्या डाव्या बाजूला लागला. तो लगेच खाली बसला. नॉन स्ट्रायकर एंडवर उभा असलेला मोहम्मद सिराजने लगेच त्याच्याकडे धाव घेतली. बुमराहचे प्रथम श्रेणीत पहिले अर्धशतकभारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलिया ए विरोधात गुलाबी चेंडूत सराव सामन्यात पहिल्या दिवशी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक झळकावले. बुमराह याने ५७ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या. भारतीय फंलदाजांना येथे धावा करण्यात अडचणी येत होत्या. तर बुमराहने शानदार फलंदाजी करताना सहा चौकार आणि दोन षटकार देखील लगावले. 

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया