Join us  

Asia Cup 2018: 'शेजाऱ्यां'चं भांडण, आशिया चषकाला फटका, रद्दही झाली होती स्पर्धा

Asia Cup 2018: आशियाई खंडातील सर्वोत्तम संघ कोण? या उत्तराचा पाठलाग शनिवारपासून सुरू होणार आहे. 14 व्या आशिया चषक वन डे क्रिकेट स्पर्धा उद्यापासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:28 PM

Open in App
ठळक मुद्देआशिया चषक स्पर्धेला संघांच्या माघार घेण्याचे दोन वेळा ग्रहण लागले आहे.भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धीशिवाय आशिया चषक स्पर्धा पचनी पडतच नाही.

दुबई, आशिया चषक 2018 : आशियाई खंडातील सर्वोत्तम संघ कोण? या उत्तराचा पाठलाग शनिवारपासून सुरू होणार आहे. 14 व्या आशिया चषक वन डे क्रिकेट स्पर्धा उद्यापासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवली जाणार आहे. 6 संघ, 13 सामने आणि 1 विजेता असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ जेतेपद कायम राहण्यात यशस्वी होईल का, भारत-पाकिस्तान यांच्यात कोण बाजी मारेल, रोहित शर्माचे  नेतृत्वकौशल्य, आदी अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करून बसले आहेत.1984 पासून दर दोन वर्षांनी आशिया चषक स्पर्धा खेळवली जात आहे. 1993 साली या स्पर्धेत खंड पडला होता. 1997 नंतर ही स्पर्धा तीन वर्षांनी, तर 2000 नंतर चार वर्षांनी खेळवण्यात आली, परंतु 2008 पासून दर दोन वर्षांनी स्पर्धेचे आयोजन केले जाते. युएईमध्ये 1984 आणि 1995 नंतर प्रथमच आशियाई स्पर्धा खेळवण्यात येत आहे. 2016 मध्ये आशिया चषक स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आली आणि त्यात भारताने रोमहर्षक विजयासह जेतेपद पटकावले. पुढील टी-20 आशिया चषक 2020 मध्ये होणार आहे. या स्पर्धा इतिहासात अशाही काही गोष्टी घडल्या आहेत, ज्या अनेकांना माहित नसतील. आशिया चषक स्पर्धेला संघांच्या माघार घेण्याचे दोन वेळा ग्रहण लागले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धीशिवाय आशिया चषक स्पर्धा पचनी पडतच नाही. पण असे घडले आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी एक वेळा या स्पर्धेतून माघार घेतली आहे. 1984 च्या स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने 1986च्या स्पर्धेतून माघार घेतली होती. ही स्पर्धा श्रीलंकेत आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी श्रीलंकन सरकार आणि एलटीटीई यांच्यातील संघर्ष विकोपाला पोहोचला होता. भारतीय सरकार आपल्या खेळाडूंच्या आयुष्याशी कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हते. त्याचबरोबर 1985च्या श्रीलंका दौऱ्यात यजमानांनी रडीचा डाव खेळून भारताला पराभूत केले होते आणि संघातील अनेक खेळाडू नाराजही होते. याही कारणामुळे भारतीय संघाने स्पर्धेतून माघार घेतली होती. भारताला 1990-91च्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते, परंतु शेजारील पाकिस्तानने उभय देशांतील तणावजन्य परिस्थितीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्या वादामुळे 1993 मध्ये चक्क आशिया चषक स्पर्धा खेळवण्यातच आली नाही. शेजाऱ्यांच्या भांडणाचा आशिया चषक स्पर्धेला असा फटका बसलेला आहे.

टॅग्स :आशिया चषकभारतपाकिस्तान