नेपियर : ऑस्ट्रेलियाला नमविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम राखून बुधवारी पहिल्या वन-डेत न्यूझीलंडलादेखील आठ गड्यांनी सहज लोळवले. अंधूक सूर्यप्रकाशामुळे सामन्यात वारंवार व्यत्यय येताच खेळ थांबवावा लागला होता.
आॅस्ट्रेलियावर कसोटी आणि वन-डे मालिका विजय मिळविणाऱ्या भारताने येथे पाच सामन्यांच्या मालिकेचा विजयी श्रीगणेशा केला. विजयासाठी संशोधित १५६ धावांचे लक्ष्य भारताने ३४.५ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. पावसामुळे खेळ थांबला नव्हता; पण अंधूक प्रकाशाअभावी डकवर्थ-लुईस पद्धतीचा अवलंब करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
याआधी फिरकीपटू कुलदीप यादव आणि वेगवान मोहम्मद शमी यांच्या भेदक माºयाच्या बळावर भारताने न्यूझीलंडला ३८ षटकांत १५७ धावात गुंडाळले. यादवने १० षटकांत ३९ धावांत चार आणि शमीने सहा षटकांत १९ धावांत तीन गडी बाद केले. युजवेंद्र चहलने दोन बळी घेतले. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने ८१ चेंडंूत ६४ धावा ठोकल्या.
भारताने एका गड्याच्या मोबदल्यात ४४ धावा करताच चेंडू दिसेनासा झाला होता. आंतरराष्टÑीय सामन्यात असा प्रसंग प्रथमच घडला. अर्ध्या तासानंतर खेळ सुरू झाला तेव्हा भारताला विजयासाठी ४९ षटकांत १५६ धावांचे लक्ष्य देण्यात आले. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर कोहली- धवन यांनी विजयाच्या दारात आणून ठेवले. विराटने ४५ धावा केल्या.
धवनने वन-डेत २६ वे अर्धशतक गाठलेच, शिवाय पाच हजार धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज ठरला. ११८ डावांत धवनने ही कामगिरी केली आहे. न्यूझीलंडची सुरुवात वाईट झाली. पाच षटकांत दोन्ही सलामीवीर बाद झाले, तेव्हा १८ धावा होत्या. रॉस टेलरने ४१ चेंडूंत २४ धावा केल्या. टेलर आणि कर्णधार विलियम्सन यांनी डाव सावरला; पण दोघेही बाद होताच न्यूझीलंडची स्थिती ३० षटकांत ६ बाद १३३ अशी झाली होती. (वृत्तसंस्था)
>शमीचे बळींचे शतक
नेपियर : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध वन-डेत १०० बळींचा विक्रम केला. ५६ सामन्यांत त्याने ही कामगिरी केली. सलामीवीर मार्टिन गुप्तिल हा शमीचा शंभरावा बळी ठरला. शमीने इरफान पठाण, झहीर खान, अजित आगरकर आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकले आहे. इरफानने ५९ सामन्यांत १००, झहीरने ६५ सामन्यांत १००, आगरकरने ६७ सामन्यांत आणि श्रीनाथने ६८ सामन्यांत बळींचे शतक गाठले होते.
>धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल त्रि.गो. शमी ५, कोलिन मुन्रो त्रि.गो. शमी ८, केन विलियम्सन झे. शंकर गो. यादव ६४, रॉस टेलर झे. आणि गो. चहल ३४, टॉम लाथम झे. आणि गो. चहल ११, हेन्री निशोल्स झे. यादव गो. जाधव १२, मिशेल टेनटनेर पायचित गो. शमी १४, डग ब्रासवेल त्रि.गो. यादव ७, टीम साऊदी नाबाद ९, लोकी फर्ग्युसन यष्टिचित धोनी गो. यादव ००, ट्रेन्ट बोल्ट झे. शर्मा गो. कुलदीप १, अवांतर २, एकूण: ३८ षटकांत सर्वबाद १५७ धावा
गडी बाद क्रम : १/५, २/१८, ३/५२, ४/७६, ५/१०७, ६/१३३, ७/१४६, ८/१४६, ९/१४८, १०/१५७. गोलंदाजी : भुवनेश्वर ५-०-२०-०, शमी ६-२-१९-३, शंकर ४-०-१९-०, चहल १०-०-४३-२, यादव १०-१-३९-४, जाधव ३-०-१७-१.
भारत : शिखर नाबाद ७५, रोहित झे. गुप्तिल गो. ब्रेसवेल ११, कोहली झे. लाथम गो. फर्ग्युसन ४५, अंबाती नाबाद १३, अवांतर १२, एकूण : ३४.५ षटकात २ बाद १५८. गडी बाद क्रम : १/४१, २/१३२. गोलंदाजी : बोल्ट ६-१-१९-०, साऊदी ६.५-०-३६-०, फर्ग्युसन ८-०-४१-१, ब्रेसवेल ७-०-२३-१, सेंटनेर ७-०-३२-०.