Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात

KL Rahul Wicket : लोकेश राहुल अनोख्या पद्धतीने बाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 12:45 IST

Open in App

india a vs australia a : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारताच्या युवासेनेला सराव परिक्षेत अपयश आले. सध्या भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात मालिका खेळवली जात आहे. दुसऱ्या सामन्यासाठी लोकेश राहुल ऋतुराज गायकवाडच्या संघासोबत जोडला. मागील काही कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत असलेला राहुल अद्याप फॉर्मच्या शोधात आहे. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात चार तर दुसऱ्या डावात त्याला दहा धावा करता आल्या. विशेष बाब म्हणजे हास्यास्पदपणे बाद झालेला राहुल पुन्हा एकदा टीकाकारांच्या निशाण्यावर आला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होत असलेल्या या लढतीत यजमानांचा वरचष्मा पाहायला मिळाला. लोकेश राहुल पहिल्या डावात स्कॉट बोलंडची शिकार झाला, तर दुसऱ्या डावात त्याने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेत कोरी रॉकिचोलीच्या चेंडूवर बाद झाला. राहुल विचित्र पद्धतीने बाद झाल्याने चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

खरे तर २२ तारखेपासून ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टीम इंडिया कसोटी मालिका खेळणार आहे. आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलामीच्या सामन्याला भारतीय कर्णधार रोहित शर्मा मुकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या जागी राहुलला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राहुलचा फ्लॉप शो कायम असल्याने निवडकर्ते इतर फलंदाजाला संधी देऊ शकतात. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत पाचपैकी चार सामने जिंकायचे आहेत.

भारताचा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, तनुष कोटियन, खलील अहमद, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलियाचा संघ -नाथन मॅकस्वीनी (कर्णधार), मार्कस हॅरिस, सॅम कोनस्टास, कॅमरुन बॅनक्रॉफ्ट, ब्यू वेबस्टर, ओलिव्हर डेव्हिस. जिमी पीरसन, मायकल नेसर, नाथन मॅकअँड्यू, स्कॉट बोलंड, कोरी रॉकिचोली.

टॅग्स :लोकेश राहुलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया