ठळक मुद्देभारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा वन डे सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज होणार आहे.
मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पुण्यात झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवून भारतीय संघाला धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ चौथ्या सामन्यात संघात मोठे फेरफार करण्याच्या तयारीत आहे. तिसऱ्या सामन्यात एक अतिरिक्त फलंदाज संघात असता तर कदाजित भारताला विजय मिळवणे सोपे झाले असते. हीच बाब लक्षात घेता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
सलामीवीर रोहित शर्माला मागील दोन सामन्यांत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र, आजच्या सामन्यात तो कमबॅक करेल अशी अपेक्षा आहे. शिखर धवन आणि अंबाती रायुडू यांनी सातत्यपूर्ण खेळ केलेला आहे. या मालिकेत कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीला तोडच नाही. मात्र, त्यानंतर संघाला सावरेल असा खेळाडू चमूत नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फॉर्मशी झगडत आहे. भारताने अखेरच्या दोन सामन्यांसाठी केदार जाधवला संधी दिली आहे आणि त्याला आजच्या सामन्यात खेळवले जाऊ शकते.
केदारच्या समावेशानंतर रिषभ पंतला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याशिवाय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही अंतिम अकरामध्ये खेळू शकतो. अशा परिस्थितीत कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहल यापैकी एकच संघात फिट बसेल. भुवनेश्वर कुमार आणि जस्प्रीत बुमरा यांना मदत म्हणून उमेश यादव किंवा मोहम्मद शमी यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे खलील अहमदला डच्चू मिळू शकतो.