Join us

IND vs WIN 1st T20I : 'हिटमॅन' रोहित शर्माला खुणावतोय विश्वविक्रम

IND vs WIN 1st T20I: कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना विश्रांती देण्यात आल्यामुळे रोहित शर्मा नेतृत्व सांभाळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 17:14 IST

Open in App

कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. भारताने कसोटी ( 2-0) आणि वन डे (3-1) मालिकेत विंडीज संघाला पराभवाची चव चाखवली आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 मालिकाही खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना विश्रांती देण्यात आल्यामुळे रोहित शर्मा नेतृत्व सांभाळणार आहे. या मालिकेत रोहितला विश्वविक्रम खुणावत आहे. त्याशिवाय या मालिकेत आणखी विक्रमांची नोंद होऊ शकते. 

  • वन डे मालिकेत मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला ट्वेंटी-20 मालिकेत एक विक्रम करण्याची संधी आहे. धवनने 40 ट्वेंटी-20  सामन्यांत 977 धावा केल्या आहेत आणि त्याला 1000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे.
  • भारताचा प्रमुख गोलंदाज जस्प्रीत बुमरा याला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विकेटचे अर्धशतक करण्याची संधी आहे. त्याने 35 ट्वेंटी-20 सामन्यांत 43 विकेट घेतल्या आहेत. त्याने ही कामगिरी केल्यास ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विकेटचे अर्धशतक करणाऱ्या दुसऱ्या भारतीय गोलंदाजाचा मान त्याला मिळणार आहे. त्याशिवाय सर्वात जलद हा पल्ला गाठणारा तो भारतीय गोलंदाज ठरू शकतो.
  • कर्णधार रोहित शर्माला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक पूर्ण करण्याची संधी आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरू शकतो. त्याच्या नावावर 89 षटकार आहेत आणि शतक पूर्ण करण्यासाठी त्याला 11 षटकारांची गरज आहे. सध्याच्या घडिला मार्टिन गप्टिल आणि ख्रिस गेल यांच्या नावावर षटकारांचे शतक आहे.
  • ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही रोहितला नावावर करण्याची संधी आहे. त्याच्या नावावर 84 सामन्यांत 2086 धावा आहेत आणि तो पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र, त्याला पहिल्या क्रमांकावर असलेल्या मार्टिन गप्टिलला ( 2271) पिछाडीवर टाकण्यासाठी 185 धावा करण्याची गरज आहे.
  • कसोटी आणि वन डे मालिकेत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला ट्वेंटी-20 मालिका जिंकणे इतके सहज नाही. उभय देशांमध्ये झालेल्या 8 सामन्यांत भारत 2-5 असा पिछाडीवर आहे. 2011 नंतर भारताने विंडीजवर एकही ट्वेंटी-20 मालिका विजय मिळवलेला नाही. 
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर विकेट पूर्ण करण्याची युजवेंद्र चहलला संधी आहे. त्याला ही कामगिरी करण्यासाठी 2 विकेट हव्या आहेत. वन डे आणि ट्वेंटी-20 सामन्यात त्याच्या नावावर अनुक्रमे 56 व 42 विकेट्स आहेत.  
टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माजसप्रित बुमराहयुजवेंद्र चहल