कोलाकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेत यजमानांनी 3-1 अशी बाजी मारली. कसोटी मालिकेतही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2-0 असा विजय मिळवला होता. आता भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेकडे मोर्चा वळवला आहे आणि पहिला सामना रविवारी कोलकाता येथील इडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहे. मात्र, या मालिकेत कर्णधार विराट आणि अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी याची उणीव जाणवणार आहे. या दोघांचाही ट्वेंटी-20 संघात समावेश नाही.
या मालिकेत
रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे, तर रिषभ पंत यष्टिमागे आपली भूमिका पार पाडणार आहे. कृणाल पांड्याही राष्ट्रीय संघाकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात असा असेल अंतिम संघसलामी :रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांनी नुकत्याच पार पडलेल्या वन डे मालिकेत साजेशी कामगिरी केली आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 मालिकेतही त्यांच्याकडून त्याच कामगिरीची अपेक्षा आहे.
मधली फळी :विराट कोहलीच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय दिनेश कार्तिक, रिषभ पंत आणि कृणाल पांड्या हे मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. पंत यष्टिरक्षक म्हणून मैदानात उतरेल.
फिरकी गोलंदाजीः कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल हे तीन प्रमुख फिरकी गोलंदाज संघात असतील कृणालच्या समावेशामुळे अतिरिक्त गोलंदाज भारताला मिळाला आहे.
जलदगती गोलंदाजः जस्प्रीत बुमरा आणि भुवनेस्वर कुमार हे दोन प्रमुख अस्त्र भारतीय संघाच्या दिमतीला असतील.