गुवाहाटी : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात अपेक्षेनुसार रिषभ पंतला भारतीय वन डे संघातून पदार्पण करण्याची संधी मिळाली. इंग्लंड दौऱ्यावर रिषभने कसोटी संघात पदार्पण केले होते, तत्पूर्वी 2017 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्धच ट्वेंटी-20 संघात एन्ट्री घेतली होती. वयाच्या 21 व्या वर्षी त्याने भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा तो दुसरा युवा खेळाडू ठरला आहे.
पंतचे वय 21 वर्षे आणि 17 दिवस आहे. तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा सर्वात युवा भारतीय खेळाडूचा मान जलदगती गोलंदाज इशांत शर्माच्या नावावर आहे. त्याने 19 वर्षे व 152 दिवसांचा असताना भारतीय संघाकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इशांतने 2007 साली बांगलादेशविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेत आणि 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले.