राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : मुंबईकर पृथ्वी शॉने भारतीय कसोटी संघात गुरुवारी पदार्पण केले. या युवा खेळाडूला वरिष्ठ संघाकडून खेळताना कोणतेही दडपण जाणवू नये यासाठी कर्णधार विराट कोहलीने त्याच्याशी चक्क मराठीत संवाद साधला होता. 18 वर्षीय पृथ्वीला इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या दोन कसोटी सामन्यात भारतीय संघात सहभागी केले होते, परंतु त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही.
गुरुवारी त्याला अखेर संधी मिळाली. त्याने BCCI.TV ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, '' विराट कोहलीला आपल्याला खडूस वाटत असला तरी तो खूप मनमिळावू आहे. माझ्यावरील दडपण कमी व्हावे म्हणून त्याने माझ्याशी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला. मी सुरूवातीला नर्व्हस होतो. मात्र ड्रेसिंग रूममध्ये सर्वांनी माझे स्वागत केले. मला दडपण जाणवू दिले नाही. येथे कोणी वरिष्ठ व कनिष्ठ नाही, असे मला विराट आणि रवी शास्त्री यांनी सांगितले.''