Join us  

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या दिवसअखेर 7 बाद 295धावा

IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज सुरूवात झाली. कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर विंडीजने 7 बाद 295 धावा केल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 9:30 AM

Open in App

हैदराबाद - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना होत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोस्टन चेस ( 98) आणि कर्णधार जेसन होल्डर ( 52 ) यांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना वेस्ट इंडिजच्या डावाला आकार दिला. मात्र दिवसाच्या अखेरच्या षटकात होल्डरला उमेश यादवने माघारी धाडले. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर विंडीजने 7 बाद 295 धावा केल्या. 

 

 

Live Update - 

विडींजचा कर्णधार जेसन होल्डर आणि रोस्टन चेस यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

उपहारानंतर वेस्ट इंडिजला उमेश यादवने आणखी एक धक्का दिला, परंतु दुसऱ्या बाजूने रोस्टन चेसने अर्धशतक पूर्ण करून संघर्ष सुरूच ठेवला.

 

एस. अंबरीसच्या रुपाने वेस्ट इंडिजला 5 वा झटका बसला आहे. त्यामुळे अवघ्या 113 धावांवरच वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रविंद्र जडेजाने अंबरीसचा झेल टिपला.

वेस्ट इंडिजचा चौथा फलंदाज श्रीम्रोन हेतमेयर 12 धावांवर बाद झाला आहे. कुलदीप यादवने हेतमेयरला पायचीत बाद केलं. वेस्ट इंडिजची धावसंख्या 92 असताना हेतमेयरच्या रुपाने इंडिजला चौथा धक्का बसला. पण, वेस्ट इंडिजने धावफलकावर आपले शतक झळकावले आहे. 37 षटकात 104 धावा केल्या.  

 

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपहारापर्यंत वेस्ट इंडिजचे 3 गडी बाद झाले आहेत. त्यामुळे उपचारापर्यंत 32 षटकात वेस्ट इंडिजला केवळ 86 धावापर्यंतच मजल मारता आली. 

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का बसला आहे, शाय होपच्या रुपाने भारताला तिसरा गडी बाद करण्यात यश आले. उमेश यादवने होमला 36 धावांवर पायचीत बाद केलं. त्यानंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या 3 बाद 86 अशी बनली होती.

 

वेस्ट इंडिजचा सलामीवीर क्रेग ब्रेथवेट 14 धावांवर खेळत असताना यष्टीचीत बाद झाला. कुलदीप यादवने ब्रेथवेटचा बळी घेतला. त्यामुळे इंडिजची 2 बाद 52 अशी अवस्था झाली. 

 

वेस्ट इंडिजकडून क्रेग ब्रॅथवेट आणि किरण पॉवेल यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, किरण पॉवेलला 22 धावांवरच तंबू गाठावा लागला. आ.अश्विनच्या गोलंदाजीवर जडेजाने पॉवेलला झेलबाद केलं, त्यावेळी संघाची धावसंख्या 32 होती. 

 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला असून आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला आज सुरूवात झाली. त्यासाठी टीम इंडियात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. मोहम्मद शमीला या सामन्यात आराम देण्यात आला असून शार्दुलची प्लेईंग इलेव्हनमध्ये एंट्री झाली आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील शार्दुल ठाकूरचा हा पहिलाच सामना आहे. तर, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार शार्दुल हा भारताचा 294 वा खेळाडू ठरला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना आहे. त्यामुळे या सामन्यासह मालिकाही जिंकण्याचा टीम इंडियाचा विराट प्रयत्न असणार आहे. दरम्यान, या कसोटी मालिकेनंतर 5 एकदिवसीय सामनेही खेळविण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिज