हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताने एक डाव व 272 धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईकर पृथ्वी शॉने पदार्पणात शतक झळकावून आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत मयांक अग्रवालला संधी देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते.
भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मयांक आणि पृथ्वी स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहेत. इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या दोन कसोटीसाठी पृथ्वीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मयांकला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी समावेश करण्यात आला. मात्र, त्याला राजकोट कसोटीत बाकावरच बसावे लागले. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे महत्त्व लक्षात घेता विराटला पुरेशी विश्रांती देण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे मयांकला संधी मिळण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी असा असेल भारतीय संघ
सलामीः पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुल
मधली फळीः मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व रिषभ पंत
फिरकी गोलंदाजः कुलदीप यादव, आर अश्विन किंवा रवींद्र जडेजा
जलदगती गोलंदाजः उमेश यादव व मोहम्मद शमी.