चेन्नई : भारताने ट्वेंटी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजला पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी चेन्नई येथे होणार आहे आणि हा सामना भारतासाठी केवळ औपचारिक राहणार आहे. त्यामुळे या सामन्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन भारतीय संघात नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात जस्प्रीत बुमरा, उमेश यादव आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी तशी घोषणा केली. त्यांच्या जागी संघात सिद्धार्थ कौलचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पण, या लढतीत कौलला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.