लखनौ : 2019ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत भारतीय संघात बरेच प्रयोग पाहायला मिळत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय संघाने सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी संघात युवा यष्टिरक्षक रिषभ पंतला संधी देण्यात आली. कसोटीपाठोपाठ पंतला वन डे आणि ट्वेंटी-20 संघातही खेळण्याची संधी मिळाली. मात्र, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ट्वेंटी-20 मालिकेत पंतला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि त्यावरून सोशल मीडियावर तो ट्रोल झाला आहे. विशेषकरून माहीचे फॅन्स पंतला टार्गेट करत आहेत.
पंतने ट्वेंटी-20 मालिकेतील दोन सामन्यांत केवळ सहाच धावा केल्या. सध्याच्या संघात दोन यष्टिरक्षक खेळत आहेत. दिनेश कार्तिक यष्टिमागची भूमिका पार पाडत आहे, तर पंत फलंदाज म्हणून संघात आहे. संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांच्या अपेक्षांना साजेशी कामगिरी करण्यात पंत अपयशी ठरला आहे.