Join us  

"IPL च्या कामगिरीवरूनच निवड होणार असेल, तर मग युवकांनी रणजीमध्ये खेळायचंच कशाला?"

सर्फराज खानची ( Sarfaraz Khan) भारतीय कसोटी संघात निवड न झाल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 10:48 AM

Open in App

IND vs WI Series : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सर्फराज खानची ( Sarfaraz Khan) भारतीय कसोटी संघात निवड न झाल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने टीम इंडियाची निवड झाली आहे, त्यामुळे रणजी करंडक आणि त्यात खेळणारे खेळाडू यांचे महत्त्व कमी झाले आहे, असे ते म्हणाले. सर्फराजचे उदाहरण देत सुनील गावस्कर म्हणाले की, ''देशांतर्गत क्रिकेटमधील या फलंदाजाची कामगिरी ओळखायला हवी होती. सर्फराज गेल्या तीन हंगामात १००च्या वर सरासरीने धावा करत आहे. संघात निवड होण्यासाठी त्याला आणखी काय करावे लागेल? प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा जरी झाली नाही तरी त्याला संघात घेता येईल.'' 

''चेतेश्वर पुजाराच्या मागे मिलियन फॉलोअर्स नाहीत, म्हणून त्याला बळीचा बकरा बनवलं'' 

मुंबईकडून खेळणारा सर्फराज खान २०२० पासून सातत्याने चांगला खेळत आहे. गेल्या मोसमात त्याने सहा सामन्यांत ९२.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या होत्या. यामध्ये तीन शतकांचा समावेश होता. यापूर्वी २०२१-२२ हंगामात त्याने सहा सामन्यांत १२२.७५  च्या सरासरीने ९८२ धावा केल्या होत्या आणि तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. यामध्ये चार शतकांचा समावेश होता. २०१९-२० हंगामात त्याने सहा सामन्यांत तीन शतकांसह १५४.६६च्या सरासरीने ९२८ धावा केल्या. तीन हंगामात त्याने १० शतकांसह २४६६ धावा केल्या आहेत. गावस्कर पुढे म्हणाले,''त्याला सांगा की त्याची कामगिरी पाहिली जात नाही, तू रणजी करंडक खेळणे बंद कर. फक्त आयपीएल खेळ आणि समजून घ्या की तो लाल चेंडूचे क्रिकेटही चांगले खेळू शकतो.''  

 सर्फराज खानची निवड न करण्यामागे असा युक्तिवाद केला जातो की त्याचा फिटनेस योग्य नाही आणि तो खूप लठ्ठ आहे. हे कारण असेल तर त्याचा त्याच्या कामगिरीवर काही परिणाम होईल असे वाटत नाही. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी असेही नमूद केले आहे की जर तुम्हाला सडपातळ दिसणारा मुलगा हवा असेल तर तुम्ही एक मॉडेल शोधा, कारण सर्फराज खान त्याच्या स्थितीत धावांचा डोंगर उभा करत आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसुनील गावसकर
Open in App