मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात रोहित शर्माचाच दबदबा जाणवला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहितने 137 चेंडूंत 20 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 162 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. त्याने क्षेत्ररक्षणातही आपले नाणे खणखणीत वाजवताना तीन झेल टिपले.
वन डे क्रिकेट इतिहासात एकाच सामन्यात 150 पेक्षा अधिक धावा आणि तीन झेल टिपण्याचा पराक्रम प्रथमच झाला. वन डे क्रिकेटच्या 47 वर्षांच्या इतिहासात कोणाला न जमलेला पराक्रम रोहितने सोमवारी करून दाखवला.
![]()
रोहितच्या खेळीच्या जोरावर भारताने 377 धावांचा डोंगर उभारला आणि वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवता आला. रोहितने क्षेत्ररक्षणात खलील अहमदच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये मार्लोन सॅम्युअलचा झेल टिपला. त्यानंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर फॅबियन अॅलन आणि अॅशले नर्स यांचा कॅच घेतला.