राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण करण्यापूर्वी 18 वर्षीय पृथ्वी शॉ याच्यावर प्रचंड दडपण होते. त्याला अनेक वरिष्ठ खेळाडूंनी सल्ला दिला. त्यात अजिंक्य रहाणेचा सल्ला पृथ्वीने ऐकला आणि पहिल्या षटकापासून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पृथ्वीची निवड झाली आणि त्याला आनंद गगनात मावेनासा झालेला. त्याचवेळी त्याला वरिष्ठ संघाकडून खेळणार असल्याचे दडपणही होते. मात्र, मुंबईकर अजिंक्य रहाणेने त्याला एक सल्ला दिला. अजिंक्यने त्याचा खेळ जवळून पाहिला आहे. त्यामुळे अजिंक्यने त्याला मुंबई संघाकडून खेळतोस तसाच बिनधास्त भारताकडूनही खेळ, असा सल्ला दिला होता.
गुरुवारी पृथ्वीची फलंदाजी पाहून त्याने अजिंक्यचा सल्ला मनावर घेतल्याचे जाणवले. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याने कव्हर आणि पॉईंटच्या खेळाडूंमधून बॅकफूट फटका मारला आणि तीन धावा काढल्या. त्यानंतर त्याने सातत्याने धावांचा ओघ कायम राखत संघाला अर्धशतकाची वेस ओलांडून दिली आणि त्यात त्याच्या वैयक्तिक 31 धावा होत्या.