नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्ध ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या काही दिवसआधीच भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने टीम इंडिया संकटात आली. शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि नवदीप सैनी या चार प्रमुख खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. धवन संघाबाहेर गेल्याने कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी लोकेश राहुलचा पर्याय आहे. मात्र, त्याने पहिल्या सामन्यात न खेळण्याचा आपला निर्णय कायम ठेवल्याने भारतीय संघ अडचणीत आला आहे.
उपकर्णधार राहुलने पहिल्या सामन्यासाठी आपण उपलब्ध राहणार नसल्याचे याआधीच कळवले होते. आधी त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला अशी समजूत झाली होती. मात्र, खरे कारण आता समोर आले असून बहिणीच्या लग्नासाठी राहुलने पहिल्या सामन्यासाठी रजा घेतली असून तो ६ फेब्रुवारीलाच भारतीय संघात जुळेल. यानंतर तीन दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर ९ फेब्रुवारीला मालिकेतील दुसरा सामना खेळेल.
मयांकला केले पाचारण
राहुल पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रोहितचा सलामी जोडीदार म्हणून मयांक अग्रवालला बीसीसीआयने बोलावले आहे. अग्रवालसह आणखी काही खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला असून त्यांची नावेही बीसीसीआयकडून लवकरच जाहीर करण्यात येतील. प्रमुख खेळाडू विलगीकरणात गेल्यानंतर भारतीय संघाकडे रोहित, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, मयांक आणि दीपक हुड्डा असे पाच फलंदाज आहेत. अशा परिस्थितीमध्ये कर्णधार रोहितची अंतिम संघ निवडण्याची कसोटी लागेल.
अक्षरही कोरोनाबाधित
अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो भारताच्या कॅम्पमध्ये दाखल झालेला नाही. कोरोना पॉझिटिव्ह आलेला भारताच्या संघातील तो पाचवा खेळाडू आहे. अक्षर पटेलचा केवळ टी-२० मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी तो अहमदाबाद येथे बायोबबलमध्ये दाखलही होणार होता; परंतु आता त्याला विलगीकरणात जावे लागणार आहे. याआधी शिखर धवन, नवदीप सैनी, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर हे भारताचे प्रमुख चार खेळाडू कोरोनाग्रस्त आढळले होते.