राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुबळ्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला. दुसऱ्या डावात त्याने संयमी सुरूवात केली, परंतु त्यांचा संपूर्ण संघ 196 धावांवर माघारी परतला. याचबरोबर भारताने घरच्या मैदानावर कसोटी विजयाचे शतक साजरे केले.
भारताचा घरच्या मैदानावरील हा शंभरावा विजय ठरला. 1933 ते 2018 या कालावधीत भारताने मायदेशात 266 सामने खेळले आणि त्यात 100 विजयांची नोंद केली. वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने विजयाचे शतक झळकावले. 52 सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला, तर एक सामना अनिर्णीत सुटला.
वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 272 धावांनी मिळवलेला हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. याआधी भारताने अफगाणिस्तानला एक डाव व 262 धावांनी पराभूत केले होते. वेस्ट इंडिजला भारताने घरच्या मैदानावर पाचव्यांदा डावाने पराभूत केले आहे.