मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा वन डे सामना वानखेडे स्टेडियमवर होणार नसून तो आता मुंबईतीलच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) अर्थात ब्रेबॉर्न स्टेडियमवर येथे खेळवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडलेल्या प्रशासकीय समितीने हा निर्णय घेतला आहे. 29 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. 5 नोव्हेंबर 2006 नंतर प्रथमच येथे आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धचा क्रिकेट सामना आयोजनावरुन इंदूरच्या होळकर स्टेडियमविषयी वाद उद्भवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मुंबई क्रिकेट संघटनेवर (एमसीए) एकदिवसीय सामना आयोजनाबाबत पूर्ण विश्वास आहे. परंतु, २९ ऑक्टोबरला होणारा विंडीजविरुद्धचा सामना आयोजित करण्यासाठी आर्थिक अडचणी येत असल्याचे कारण एमसीएने दिले होते.
'' सर्वोच्च न्यायलयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने चौथा वन डे सामना वानखेडेत होणार नसल्याचे स्पष्ट केले. 29 ऑक्टोबरला होणारा हा सामना क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे होणार आहे,''असे बीसीसीआयने आपल्या निवेदनात स्पष्ट केले. दरम्यान, हा सामना आयोजन करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सीसीआयचे प्रमुख कपिल मल्होत्रा यांनी सांगितले.