Join us  

ते २ षटकार! पूरनचा हार्दिकवर 'हल्लाबोल', कॅरेबियन खेळाडूने पांड्याची केली बोलती बंद

IND vs WI 5th T20 : ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा सामना जिंकून वेस्ट इंडिजने ३-२ ने मालिका जिंकली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 3:47 PM

Open in App

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-२० मालिका संपल्यानंतर निकोलस पूरनने हार्दिक पांड्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. कॅरेबियन खेळाडूने अकिल हुसैनसोबत एक व्हिडीओ बनवला आहे, ज्यामध्ये तो तोंड बंद ठेवण्याचे हावभाव करत आहे. तसेच निकोलस पूरनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवून हार्दिकला डिवचण्याचा प्रयत्न केला. पूरनच्या पोस्टवरून तो काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे, पण त्याच्या स्टोरींवरून अनेक बाबी उघड होत आहेत. 

काय आहे संपूर्ण प्रकरण? भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते, मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत सात गडी राखून सामना जिंकला होता. यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला होता की, निकोलस पूरनने त्याच्याविरुद्ध मोठे शॉट्स खेळले तर मला ते आवडेल. हार्दिकने म्हटले होते, "निकीला माझ्या गोलंदाजीवर मोठे शॉर्ट्स खेळायचे असतील तर ते त्याला मारू द्या. मला हे आवडेल, मी अशा स्पर्धेचा आनंद घेतो. मला माहित आहे की तो हे ऐकेल आणि चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात माझ्याविरूद्ध आक्रमक फलंदाजी करेल."

चौथ्या सामन्यात कुलदीप यादवने पूरनला लवकर बाद केले आणि भारतीय संघाने १७९ धावांचे आव्हान अगदी सहजरित्या पार केले. भारताकडून शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी अर्धशतके झळकावून संघाला विजय मिळवून दिला. पाचव्या सामन्यात पूरनने हार्दिकची इच्छा पूर्ण केली अन् १६६ धावांचा पाठलाग करताना त्याने हार्दिकच्या एका षटकात सलग दोन षटकार ठोकले. पूरनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हार्दिकला मारलेल्या दोन षटकारांची झलक दाखवली आहे. 

भारताचा पराभव अन्...पूरनने अप्रतिम खेळी करताना ४७ धावा करून ब्रँडन किंगला साथ दिली. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. याशिवाय त्याने 'मालिकावीर'चा पुरस्कार देखील पटकावला. पूरनच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने मालिका ३-२ ने जिंकली. भारताने २५ महिन्यांत पहिली ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय मालिका गमावली आणि वेस्ट इंडिजने भारताकडून सलग ११ मालिका गमावल्यानंतर एक मालिका जिंकली.  

टॅग्स :हार्दिक पांड्याभारत विरुद्ध वेस्ट इंडिजट्रोलभारतीय क्रिकेट संघ
Open in App