Join us

IND vs WI : फायनल सामन्यात वेस्ट इंडिज 'किंग', भारताने सामन्यासह मालिकाही गमावली

IND vs WI 5th T20 : ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा सामना जिंकून वेस्ट इंडिजने ३-२ ने मालिका जिंकली. 

By ओमकार संकपाळ | Updated: August 14, 2023 00:39 IST

Open in App

फ्लोरिडा (अमेरिका) | IND vs WI 5th T20 Live Updates in marathi : वेस्ट इंडिजच्या ब्रँड किंगने त्याच्या नावाप्रमाणेच पाचव्या सामन्यात 'राज' केलं. ८५ धावांची नाबाद खेळी करून किंगने भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमानांनी आघाडी घेतली होती. पण, सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिका जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या. मात्र, तिसऱ्या आणि फायनल सामन्यात हार्दिकसेनेला पराभवाचा सामना करावा लागला अन् विडिंजने ३-२ ने मालिका खिशात घातली. ५५ चेंडूत नाबाद ८५ धावा करून ब्रँड किंगने सामना एकतर्फी केला. भारताने तब्बल सहा वर्षानंतर विडिंजविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका गमावली आहे. 

भारताने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजला कायल मेयर्सच्या रूपात पहिला झटका बसला. पण, किंग आणि निकोलस पूरन यांनी अप्रतिम खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कॅरेबियन संघाने १८ षटकांत २ गडी गमावून १७८ धावा करून विजय साकारला. भारताकडून तिलक वर्माने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये निकोलस पूरनच्या रूपात आपला पहिला बळी पटकावला. अर्शदीप सिंगने सुरूवातीला एक बळी घेऊन विडिंजला मोठा झटका दिला पण त्यानंतर कोणत्याच भारतीय गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही.  

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६५ धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यकुमार यादव (६१) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जैस्वाल (५), शुबमन गिल (९), तिलक वर्मा (२७), संजू सॅमसन (१३), हार्दिक पांड्या (१४) आणि अर्शदीप सिंगने (८) धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर अकील हौसेन (२) आणि जेसन होल्डर (२) आणि रॉस्टन चेस यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ -रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App