त्रिवेंद्रम : येथे गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात बाजी मारून आणखी एक आंतरराष्टÑीय मालिका जिंकण्याच्या निर्धाराने भारतीय संघ खेळेल. आतापर्यंत भारताने विंडीजविरुद्ध सलग ७ एकदिवसीय मालिका जिंकल्या असून या सामन्यास सलग आठवा मालिका विजय मिळवण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे.
भारताने याआधी २०१५ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली होती. तेव्हापासून मायदेशात संघाची विजयी घोडदौड कायम आहे. सध्याच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी आहे. मालिकेतील एक सामना टाय झाला होता. या दौºयात विंडीजकडून भारताला आव्हानाचा सामनाही करावा लागला. पुण्यात विजय मिळवून विंडीजने भारतातील विजयाचे खाते उघडले होते. त्याचवेळी, हवामान खात्याने गुरुवारी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने क्रिकेटप्रेमींचा हिरमोडही होऊ शकतो.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुण्यातील पराभवानंतर मुंबईतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्यांना तब्बल २२४ धावांनी नमविले होते. पाचव्या एकदिवसीय सामन्यातही ही लय कायम राखण्याचा प्रयत्न असेल. त्रिवेंद्रममध्ये याआधीचा सामना याच दोन संघात रंगला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजने सहज विजय मिळवला. जेसन होल्डरचा संघ त्या विजयापासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करेल. पुढील वर्षीच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघ मालिकेच्या माध्यमातून संघ बांधणी करीत आहेत. कोहली आणि रोहित शर्मा फॉर्ममध्ये असून दोघांनी क्रमश: तीन व दोन शतके ठोकली. अंबाती रायुडूनेही मुंबईत शतकी खेळी केली होती. अन्य फलंदाज मात्र अपयशी ठरले. सलामीवीर शिखर धवनला उत्कृष्ट सुरुवातीचा लाभ घेता आला नाही. अनुभवी महेंद्रसिंग धोनी सतत अपयशी ठरत आहे. या सामन्यात धोनीवर विशेष लक्ष असेल, कारण भारताकडून दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी धोनीला केवळ एक धाव हवी आहे. जससप्रीत बुमराहमुळे गोलंदाजीला बळ लाभले. गेल्या दोन सामन्यात त्याने छाप पाडली. युवा खलील अहमद यानेही ब्रेबॉर्नवर कमाल केली होती. भुवनेश्वर मात्र अद्याप फॉर्ममध्ये दिसत नाही. कोहलीला त्याच्याकडून मोठी अपेक्षा राहील. फिरकीपटूंनी विंडीजच्या फलंदाजांना सातत्याने त्रास दिला आहे.
भारत दौऱ्यात शिकण्यासाठी आलो : पोथास
भारताविरुद्ध केवळ आव्हान उभे करण्यासाठी नव्हे तर बलाढ्य विरोधी संघाकडून काही नवे शिकण्यासाठी येथे आलो, असे मत वेस्ट इंडिजचे क्षेत्ररक्षण कोच निक पोथास यांनी व्यक्त केले.
अखेरच्या एकदिवसीय सामन्याआधी संवाद साधताना पोथास यांनी ‘भारताविरुद्ध केवळ खेळण्यासाठी नव्हे तर त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासाठी आलो आहोत, उत्कृष्ट संघांकडून शिकण्यासारखे बरेच काही असते,’ असे म्हटले.
रोहित आणि विराट यांना रोखण्यासाठी काही डावपेच आखले आहेत का, असे विचारताच पोथास यांनी, ‘आमचे लक्ष केवळ दोन खेळाडूंवर नाही, असे स्पष्ट केले. या मालिकेत १-२ ने माघारलो तरी माझा युवा संघ सातत्याने सुधारणा करीत आहे. एकदिवसीय आणि कसोटीतही आमचे खेळाडू नवे तंत्र शिकण्यास धडपडत आहेत. हे सकारात्मक पाऊल म्हणावे लागेल. भारत आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना हरविण्यासाठी माझ्या संघाने योजनांवर अंमल करायला हवा.’
कसोटी सामन्यात दारुण पराभवानंतर पाहुण्या संघाची कामगिरी देखील फारशी चांगली झालेली नाही. शिमरोन हेटमेयर आणि शाय होप यांनी मात्र सर्वांना प्रभावित केले. जेसन होल्डर भारतीय फिरकीपटूंना यशस्वीपणे तोंड देताना दिसला पण अन्य फलंदाज झुंजताना दिसले. सांघिक कामगिरीच्या बळावर अखेरचा सामना जिंकून भारताला मालिका विजयापासून वंचित ठेवण्याची अपेक्षा होल्डरने व्यक्त केली आहे. नव्या ग्रिनफील्ड स्टेडियमवर हा केवळ दुसरा आंतरराष्ट्रीय सामना असेल. प्रेक्षकांची उस्फूर्त गर्दी अपेक्षित राहील. पाऊस मात्र चाहत्यांच्या उत्साहावर विरजण टाकू शकतो.
प्रतिस्पर्धी संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल, मनीष पांडे आणि केदार जाधव.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), फाबियान अॅलेन, सुनील अंबरीश, देवेंद्र बिशू, चंद्रपाल हेमराज, शिमरोन हेटमेयर, शाय होप, अल्जारी जोसेफ, एव्हिन लुईस, अॅश्ले नर्स, कीमो पाल, रोवमॅन पॉवेल, केमर रोच आणि मर्लोन सॅम्युअल्स.
Web Title: IND vs WI 5th ODI: India wins 'eighth' Pratap today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.