मुंबई : पुण्यात झालेल्या सामन्यात शानदार विजय मिळवून वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर, खडबडून जागा झालेला भारतीय संघ पुन्हा विजयी मार्गावर येऊन, पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याच्या निर्धाराने भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या मैदानावर खेळेल. अष्टपैलूची कमतरता भासलेल्या टीम इंडियाने चौथ्या सामन्यासाठी महाराष्ट्राच्या केदार जाधवची संघात निवड केली आहे.
शनिवारी पुण्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला. यावेळी धावांचा पाठलाग करताना अष्टपैलू खेळाडूची कमतरता संघाला जाणवली. मालिकेतील पहिला सामना भारताने, जिंकल्यानंतर दुसरा सामना टाय झाला. यानंतर, पुण्यात विंडिजने बरोबरी साधून मालिकेत चांगलेच रंग भरले आहेत. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना पुढील दोन्ही सामने जिंकणे आवश्यक असल्याने, आता क्रिकेटप्रेमींना अत्यंत अटीतटीचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.
कमकुवत मधली फळी यासह अनुभवी महेंद्रसिंग धोनीचा हरवलेला फॉर्म याचा फटका सध्या भारतीय संघाला बसत आहे. त्याच वेळी टी२० संघातून बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर धोनीकडे आता स्वत:ची क्षमता दाखविण्यासाठी काही मोजके संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईत त्याच्या खेळीवर विशेष लक्ष असेल. पुण्यात धोनीच्या आधी फलंदाजीला आलेल्या युवा रिषभ पंतकडूनही अपेक्षित कामगिरी झाली नाही. निवडकर्त्यांनी अखेरच्या दोन सामन्यांसाठी अष्टपैलू केदार जाधवला संघात स्थान दिले आहे. त्याच्या उपस्थितीने मधल्या फळीला बळकटी येईल, अशी शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मांसपेशींच्या दुखापतीला सामोरे जात असलेल्या केदारने देवधर ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत, आपली तंदुरुस्ती सिद्ध केली.
रोहित शर्मा-शिखर धवन या सलामीवीरांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. रोहितने पहिल्या सामन्यात शतक ठोकले असले, तरी यानंतरच्या दोन सामन्यांत त्याला आपला प्रभाव दाखविता आला नाही. दुसरीकडे धवनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. मालिकेत केवळ कर्णधार विराट कोहलीने सातत्यपूर्ण कामगिरी केली. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहवर मुख्य मदार असेल. त्याच्या तुलनेत भुवनेश्वर कुमार काहीसा महागडा ठरला होता. त्यामुळे त्याच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
सीसीआयवर सामना
क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियमवर मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळविण्यात येईल. या आधी या स्टेडियमवर २००९ साली अखेरच कसोटी सामना, तर २००६ साली अखेरचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळविण्यात आला होता.
वेस्ट इंडिजची मुख्य मदार शाय होप याच्यावर असेल. त्याने विशाखपट्टनम येथे १२३ आणि पुण्यामध्ये ९५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याचप्रमाणे, शिमरॉन हेटमायरकडूनही पुन्हा एकदा विंडिज संघाला शानदार खेळीची अपेक्षा असेल. याशिवाय किएरॉन पॉवेल, चंद्रपॉल हेमराज आणि रोवमॅन पॉवेल यांच्याकडून विंडिज संघाला आशा आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल, मनिष पांडे आणि केदार जाधव.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियन एलेन, सुनील अंबरीश, देवेंद्र बिशू, चंद्रपॉल हेमराज, शिमरॉन हेटमायर, शाय होप, अल्जारी जोसेफ, एविन लुईस, अॅश्ले नर्स, कीमो पॉवेल, रॉबमैन पॉवेल, केमार रोच आणि मार्लन सॅम्युअल्स.