ठळक मुद्देया सामन्यात कोहलीचे हे मायदेशातील सलग चौथे शतक ठरले.
पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावले. हे त्याचे सलग तिसरे शतक ठरले. पण त्याच्या या शतकानंतरही भारताला वेस्ट इंडिजवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळेच मला माझ्या शतकाविषयी काहीच बोलायचे नाही, असे कोहली सामन्यानंतर म्हणाला.
या सामन्यात कोहलीचे हे मायदेशातील सलग चौथे शतक ठरले. यावेळी त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी धडाकेबाज फलंदाज एबी डी' व्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली.
सामना संपल्यावर कोहलीची भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी कोहलीला त्याच्या या शतकांच्या हॅट्ट्रिकबद्दल प्रश्न विचारला. त्यावर कोहली म्हणाला की, " मला माझ्या शतकाविषयी काहीही सांगायचे नाही. कारण ज्या गोष्टी चांगल्या घडल्या आहेत, त्याबद्दल मला बोलायचे नाही. पण ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्याबद्दल मला बोलायला आवडेल."