India vs West Indies, 3rd ODI Live Updates : सलग दोन्ही वन डे सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या आजच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात प्रयोग केलेले पाहायला मिळणे अपेक्षित आहेत. आजच्या सामन्यात शिखर धवन सलामीला परत येईल हे कर्णधार रोहित शर्माने आधीच स्पष्ट केले होते. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात चार बदल पाहायला मिळाले आहेत. पण, आजच्या सामन्यात रोहित शर्मा व विराट कोहली यांना एकाच षटकात माघारी जावे लागले. या मालिकेत दुसऱ्यांदा हे दोन्ही फलंदाज एकाच षटकात माघारी जावं लागले आहे. भारतीय संघाने आजच्या सामन्यात शिखर धवन, दीपक चहर, कुलदीप यादव आणि श्रेयस अय्यर यांना खेळण्याची संधी दिली. त्यांच्यासाठी लोकेश राहुल, दीपक हुडा, युझवेंद्र चहल आणि शार्दूल ठाकूर यांना विश्रांती दिली गेली आहे. शिखर धवन आणि रोहित ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा सलामीला खेळताना दिसली. पहिल्याच षटकात रोहितने चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली. पण, चौथ्या षटकांत टीम इंडियाला दोन धक्के बसले. अल्झारी जोसेफने तिसऱ्या चेंडूवर रोहितचा ( १३) त्रिफळा उडवला आणि पाचव्या चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला. डाव्या बाजूने जाणारा चेंडू विराटने छेडण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची किनार घेत तो यष्टीरक्षकाच्या हाती विसावला. विराट कोहलीला सलग ७व्या वन डे सामन्यांत शतक झळकावता आलेले नाही. ( 2019 - WI Tour of IND, 2020 - AUS Tour of IND, 2020 - IND Tour of NZ, 2020 - IND Tour of AUS, 2021 - ENG Tour of IND, 2022 - IND Tour of SA, 2022 - WI Tour of IND*) भारतीय संघात वन डे क्रिकेटमध्ये १ ते ७ व्या क्रमांकावर सर्वाधिक भोपळ्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांत विराट चौथ्या क्रमांकावर आला. तो १५ वेळा शून्यावर बाद झाला आणि त्याने सुरेश रैना व वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले.
भारतीय संघ - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा ( India XI: Rohit Sharma, Shikhar Dhawan, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Rishabh Pant, Washington Sundar, Deepak Chahar, Prasidh Krishna, Kuldeep Yadav, Mohammed Siraj)