पुणे : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपत आहे. त्याच्या बॅटीतून निघणारी प्रत्येक धाव विक्रमांचे इमले रचत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतही त्याचीच प्रचिती येत आहे. बुधवारी झालेल्या दुसऱ्या वन डेत त्याने सर्वात जलद दहा हजार धावांचा पल्ला पार करण्याचा पराक्रम करताना अनेक विक्रम मोडले. पुण्यात होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातही त्याला आणखी एका विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. पुण्यातील सामन्यात तो दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डीव्हिलियर्सच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो.
विराटने विंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत अनुक्रमे 140 व 157 धावांची खेळी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा सामना शनिवारी पुण्यात खेळवण्यात येणार आहे. भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात कोहलीने 140 धावांच्या वैयक्तिक खेळीसह सलामीवीर रोहित शर्मासह 246 धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्या सामन्यातही त्याने 157 धावा कुटल्या, परंतु शाय होपच्या नाबाद शतकामुळे विंडीजने सामना बरोबरीत सोडवला.
पुण्यातील सामन्यात विराटने धावांचा पाऊस पाडून शतकी खेळी केल्यास तो डीव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो. मायभूमीत सलग चार वन डे सामन्यात शतक करण्याचा विक्रम विराट नावावर करू शकतो. या मालिकेपूर्वी विराटने ऑक्टोबर 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 113 धावा केल्या होत्या. डीव्हिलियर्सने 2010 आणि 2011 मध्ये सलग चार शतक झळकावली होती.