IND vs WI 2nd Test Predicted Playing XI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना दिल्लीत खेळवला जाणार आहे. हा सामना १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. आता दुसऱ्या सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. जसप्रीत बुमराह हा सर्वात चर्चेत असलेला खेळाडू आहे. भारताचा नवखा कसोटी कर्णधार शुबमन गिल दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह संघाबाहेर ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.
बुमराह संघाबाहेर राहणार, कारण काय?
पहिल्या कसोटीत बुमराहचे वर्कलोड मॅनेजमेंट हा चर्चेचा विषय ठरला होता. आशिया कप फायनल नंतर फक्त तीनच दिवसात त्याला कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरावे लागले. अशा परिस्थितीत बुमराह पहिल्या सामन्यात खेळला आणि चांगली गोलंदाजी केली असली. पण दिल्ली येथील दुसऱ्या कसोटीसाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. वेस्ट इंडिजचा संघ भारताविरुद्ध अत्यंत कमकुवत दिसत आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी बुमराहला विश्रांती देण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
जसप्रीत बुमराहच्या जागी प्रसिद्ध कृष्णा?
बुमराहचे वर्कलोड सांभाळण्यासाठी त्याला विश्रांती दिल्यास, त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा याला संघात स्थान दिले जाऊ शकते. जसप्रीत बुमराहची आशिया चषकातील कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. त्यामुळे त्याला लय प्राप्त व्हावी यासाठी वेस्ट इंडिजविरूद्ध त्याला खेळवण्यात आल्याचे बोलले जात आहे. पहिल्या कसोटीत त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा याला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
देवदत्त पडिकलला संधी मिळण्याची संधी?
भारत सध्या तीन अष्टपैलू खेळाडूंसह खेळत आहे. पुढच्या वर्षी जेव्हा भारत न्यूझीलंड दौऱ्यावर जाईल, तेव्हा रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. अशा वेळी भारताला सहाव्या क्रमांकावर खेळू शकणाऱ्या फलंदाजाची आवश्यकता भासेल. जाडेजा सध्या ही भूमिका बजावत आहे, परंतु तो कधीही निवृत्त होऊ शकतो. करुण नायरला संधी देण्यात आली पण तो यशस्वी ठरला नाही. त्यामुळे काही कसोटी सामन्यांसाठी देवदत्त पडिकलला संघात खेळवले जाऊ शकेल. अशा वेळी साई सुदर्शनला बाहेर बसवून गिल, जुरेल आणि नितीश रेड्डी यांना फलंदाजीत वर सरकावून पडिक्कलला सहाव्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज