India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपले २९वे कसोटी शतक पूर्ण केले. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली १००वी कसोटी त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेनवर खेळवली जात आहे. विराट कोहलीच्या १२१ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभी केली आहे. डिसेंबर २०१८नंतर विराटने प्रथमच परदेशात कसोटी शतक झळकावले आहे आणि हे त्याचे भारताबाहेरील १५वे कसोटी शतक ठरले आहे.
महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही त्याच्या ५१व्या कसोटीत शतकांमधील २९वे शतक हे पोर्ट ऑफ स्पेनमध्ये २००२ साली झळकावले होते. ५ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना तेव्हा पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला गेला होता आणि सचिनने तेथे २९ वे कसोटी शतक झळकावून सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी शतकाच्या संख्येशी बरोबरी केली होती. तेंडुलकरच्या ११७ धावांच्या त्या खेळीने भारताला ३७ धावांनी विजय मिळवून दिला होता. या विक्रमानंतर मायकेल श्युमाकरने सचिनला फेरारी ३६० भेट म्हणून दिली होती.
सुनील गावस्कर यांनीही भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या १९८३ मध्ये खेळल्या गेलेल्या ५०व्या कसोटीत शतक झळकावले होते आणि त्यांचेही ते २९वे कसोटी शतक ठरले होते. तेही १२१ धावांवर बाद झाले होते. विराट कोहलीने आज त्याच्या ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. आतापर्यंत १० खेळाडूंनी ५००+ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु एकालाही त्याच्या ५००व्या सामन्यात साधे अर्धशतकही झळकावता आलेले नव्हते.
५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर सर्वाधिक ७६ शतकं विराटने नोंदवताना सचिन तेंडुलकर ( ७५) , रिकी पाँटिंग ( ६८) आणि जॅक कॅलिस ( ६०) यांना मागे टाकले.