दिल्ली कसोटीतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या आणि अखेरच्या दिवशी केएल राहुल २५ (५४) आणि साई सुदर्शन २८ (४१) जोडीनं १ बाद ६१ धावांवरून खेळाला सुरुवात केली. विजयासाठी आवश्यक ५८ धावा ही जोडी सहज आणि वेगाने काढेल, असे चित्र दिसत असताना साई सुदर्शन पुन्हा एकदा वेस्ट इंडिज कर्णधार रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर फसला. ११ व्या षटकात तो स्लिपमध्ये झेलबाद झाला. त्याने ७६ चेंडूत ३९ धावा केल्या. पहिल्या डावात शतक हुकल्यावर दुसऱ्या डावात तो अर्धशतकाला मुकला.
शुबमन गिलनंही गमावली मॅच फिनिश करण्याची संधी
मोठी फटकेबाजी करून मॅच संपवण्याच्या नादात शुबमन गिलनंही मॅच फिनिश करण्याची चांगली संधी गमावली. भारतीय कर्णधार १५ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. रोस्टन चेस यानेच भारतीय संघाला पाचव्या दिवसाच्या खेळात दुसरा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले.